विमा कंपनीकडून अखेर रिक्षा व्यावसायिकाला मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:16 AM2021-03-13T04:16:31+5:302021-03-13T04:16:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील एका रिक्षा व्यावसायिकाला कोरोना टाळेबंदीच्या अनुषंगाने टाटा एआयजी कंपनीने विम्याच्या मुदतीत १४० दिवसांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील एका रिक्षा व्यावसायिकाला कोरोना टाळेबंदीच्या अनुषंगाने टाटा एआयजी कंपनीने विम्याच्या मुदतीत १४० दिवसांची मुदतवाढ मान्य केली. त्यामुळे सर्वच कंपन्यांना ही मुदतवाढ देणे भाग पडणार असल्याचे सांगितले जाते. तसे झाल्यास राज्यातील किमान १० लाख रिक्षा व्यावसायिकांचा प्रत्येकी २ हजार ८०० रूपयांचा फायदा होणार आहे.
आम आदमी रिक्षा संघटनेने विम्याचा हा लढा भारतीय विमा नियमन प्राधिकरणाच्या हैद्राबाद कार्यालयाकडे नेला व यात यश मिळवले. विमा कंपन्या रिक्षाचालकांना ही मुदतवाढ द्यायला तयार नव्हत्या. टाळेबंदी काळात सलग ४ महिने रिक्षा बंद असल्याने अपघात होण्याचा प्रश्न येत नाही व त्यामुळे विम्याची मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी आप, रिक्षा पंचायत व अन्य रिक्षा संघटनांनी केली होती.
प्राधिकरणाने विम्यासंबधीच्या कायद्यात अशी तरतूद असल्याचे आम आदमी रिक्षा संघटनेला कळवले. त्या आधारे किरण कांबळे या रिक्षा व्यावसायिकाने ‘आप’च्या सहाय्याने टाटा एआयजीकडे अर्ज केला. सोबत जिल्हाधिकाऱ्यांचे टाळेबंदीच्या आदेशाचे पत्र जोडले. कंपनीकडून आरटीओच्या पत्राची मागणी झाली मात्र तशी तरतुद नसल्याचे संघटनेचे सल्लागार श्रीकांत आचार्य यांनी विमा कंपनीला सांगितले. ते मान्य करून कांबळे यांना १४० दिवसांची मुदतवाढ मान्य करण्यात आली. आता त्यांना नव्या वर्षाचा विमा या १४० दिवसांनंतर काढावा लागेल. यात त्यांचा २ हजार ८०० रूपयांचा फायदा आहे.
आचार्य यांनी सांगितले की विविध विमा कंपन्यांच्या माध्यमातून विमा काढला जातो. प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा व्यावसायिकांना ते बंधनकारक आहे. त्यासाठी त्यांना वर्षाला साडेआठ हजार रूपये मोजावे लागतात. आता त्यांचे किमान १४० दिवसांचे पैसे वाचणार आहे. या निर्णयाचा राज्यातील १० लाख रिक्षा व्यावसायिकांना लाभ होणार आहे.