विमा कंपनीची फसवणूक; बनावट कागदपत्रे करणारा अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:13 AM2021-09-04T04:13:44+5:302021-09-04T04:13:44+5:30
पुणे : ‘तो’ खासगी विमा कंपनीच्या नावाचा लोगो आणि शिक्क्याचा वापर करून बनावट विमा कागदपत्रे तयार करायचा. ...
पुणे : ‘तो’ खासगी विमा कंपनीच्या नावाचा लोगो आणि शिक्क्याचा वापर करून बनावट विमा कागदपत्रे तयार करायचा. येरवडा व लोहगाव भागात हे बनावट पेपर तीनचाकी, रिक्षा, टुरिस्ट कार, टेम्पो व ट्रक अशा वाहनांच्या मालकांना कमी पैशात आर.टी.ओ पासिंगसाठी द्यायचा. त्यातील एक बनावट विमा प्रत पोलिसांच्या हाती आली. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर ती बनावट असल्याचे सिद्ध झाले. बनावट कागदपत्रे घेऊन दुचाकीवरून जात असतानाच ‘तो’ पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याच्या गाडीच्या डिकीत खासगी विमा कंपनीचे एकूण ६ लाख ३२ हजार ९४२ रुपयांचे बनावट पेपर हस्तगत करण्यात आले. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक गुन्हे शाखा २ ने ही कारवाई केली.
संतोष विठ्ठल शिंदे (वय ४७ रा.स,नं १०३ बुधविहार जवळ, गांधीनगर, येरवडा व पवार वस्ती लोहगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी व पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप व इतर कर्मचाऱ्यांना संतोष शिंदे हा १ सप्टेंबरला येरवडा भागात येणार असल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडे बनावट कागदपत्रे सापडली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी फिर्याद दिल्यानंतर आरोपीवर येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीच्या राहत्या घरी बनावट विमा कागदपत्रे तयार करण्याकरिता वापरात येणारे लॅॅपटॉप, प्रिंटर, शिक्के, स्टॅम्प पॅॅड व कोरे कागदे आदी ३२ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. आरोपीने या कामाकरिता कोणाची मदत घेतली आहे का, त्याने यापूर्वी किती लोकांना असे बनावट कागद दिले त्याबाबत तपास चालू आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोलीस अंमलदार उदय काळभोर, राजेश अभंगे, दिनकर लोखंडे, राजेश लोखंडे, विनायक रामाणे, गणेश लोखंडे, शिवाजी जाधव, दत्तात्रय खरपुडे, सुदेश सपकाळ व अमोल सरतापे यांनी केली.