विमा कंपनी कोट्यधीश; दहा जणांसाठी मोजले ५ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 02:21 AM2019-03-16T02:21:41+5:302019-03-16T02:21:57+5:30
दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा; जनजागृतीचा अभाव; ६ लाख ८४ हजार करदात्यांसाठी भरले होते पैसे
पुणे : महापालिकेने मिळकतकरदात्या नागरिकांसाठी सुरू केलेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेचा लाभ गेल्या एक वर्षात अवघ्या दहाच कुटुंबांना मिळाला आहे. पालिकेने सहा लाख ८४ हजार नागरिकांचा अपघात विमा उतरविला होता. त्यापोटी विमा कंपनीला पाच कोटी रुपयांचा प्रीमियम भरण्यात आला. मात्र, आरोग्य विभागाच्या जनजागृतीअभावी या योजनेची माहितीच बहुतांश नागरिकांना झालेली नाही. आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांच्यासह त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विमा कंपनीचे फावले आहे. मिळकत कर भरणाऱ्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसदाराला विम्यापोटी पाच लाख रुपये मिळत होते. या योजनेची पुनर्रचना करण्यात आली आहे. निवासी मिळकतकर धारकाच्या कुटुंबात तो स्वत:, त्याची पत्नी किंवा पती, त्याच्यावर अवलंबून असलेली २३ वर्षांखालील पहिली दोन अविवाहित अपत्ये, मिळकतकर दात्याचे आई व वडील अशांना विम्याची रक्कम देण्याची तरतूद आहे. पालिकेच्या २०१८-१९ च्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी तरतूद करण्यात आली होती.
मिळकतकर धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला पाच लाख रुपये, तसेच मिळकतकर धारकाच्या पत्नीचा किंवा पतीचा अपघाती मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये, मिळकतकर धारकावर अवलंबून असलेल्या २३ वर्षांखालील पहिल्या दोन पाल्यास अपघाती मृत्यू आल्यास त्याच्या कुटुंबाला मूळ विमा रकमेच्या ५० टक्के म्हणजे दोन लाख पन्नास हजार रुपये, मिळकत धारकाच्या आई किंवा वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख पन्नास हजार रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.
२८ फेब्रुवारी २०१८ ते २७ फेब्रुवारी २०१९ या कालावधीसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीसमवेत करार करण्यात आला. १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या वर्षाचा निवासी मिळकत कर व गवनी शुल्क भरणाºया करदात्यांना ही योजना लागू करण्यात आली. २८ फेब्रुवारी ते आजअखेर अपघाती मृत्यू, अपघातात पूर्ण अथवा अंशत: अंपगत्व इत्यादी कारणांसाठी योजनेंतर्ग दहा कुटुंबांना लाभ मिळाला आहे. तर उर्वरीत सहा प्रस्तावांची कार्यवाही सुरू आहे. मात्र, लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढविण्यासाठी पालिकेने जनजागृती करण्याची आणि प्रत्येक मिळकतकरदात्यापर्यंत ही माहिती पोचविण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.
अंदाजपत्रकामध्ये विमा लाभाची रक्कम पाचवरून सात लाख
महापालिकेचे या वर्षीचे (२०१९-२०) चे अंदाजपत्रक स्थायी समितीने फेब्रुवारी महिन्यात मुख्य सभेसमोर सादर केले. तब्बल ६ हजार ७८५ कोटींच्या या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये विमा लाभाची रक्कम पाचवरून सात लाख करण्यात आली.
जवळपास एक महिना होत आला तरी अद्याप आरोग्य विभागाने करदात्या पुणेकरांचा विमा उतरवलेलाच नाही. गेल्या वर्षीच्या विम्याची मुदत २८ फेब्रुवारी रोजीच संपली आहे.
त्यामुळे १ मार्चपासून नवीन विमा उतरवेपर्यंतच्या काळामध्ये अपघाती मृत्यू झालेल्या करदात्यांच्या कुटुंबांना या योजनेचा लाभच मिळणार नाही. याकडेही आरोग्य विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.