विमामाफियांचे पीक फोफावले, शेतकऱ्यांच्या नावाखाली पीक विम्यातून लूट
By नितीन चौधरी | Published: February 17, 2023 07:40 AM2023-02-17T07:40:03+5:302023-02-17T07:41:57+5:30
शेतकऱ्यांच्या नावाखाली पीक विम्यातून लूट : कृषी विभागाची तपासणी सुरू
नितीन चौधरी
पुणे : जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावाखाली पीकविम्याचे अनुदान लाटणाऱ्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर हे लोण राज्यात पुणे, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, सांगली, जालना, औरंगाबाद आदी जिल्ह्यांतही पसरल्याचे उघड झाले आहे. मूळ शेतकऱ्याला अंधारात ठेवून कोट्यवधींचे पीकविमा अनुदान लाटल्याचे कृषी विभागाच्या प्रत्यक्ष पाहणीत स्पष्ट झाले आहे.
यंदा अडीच लाख शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. त्यातील केवळ ३० हजार विमाधारक शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी झाली असून, त्यात सव्वादोन हजार बनावट शेतकऱ्यांनी पीकविमा लाटला आहे. गेल्या दोन वर्षांपासून असे प्रकार सुरू असून, राज्यात विमामाफियांचे पीक फोफावल्याचे सिद्ध होत आहे. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे २ लाख ४८ हजार ३६२ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या समवेत आतापर्यंत ३० हजार ९८२ शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पीक पाहणी केली आहे.
कोणीही काढू शकतो
संकेतस्थळावरून पीक विमा कोणीही काढू शकतो. हे माफिया विमा उतरविण्याच्या शेवटच्या दिवशी विमा न काढलेल्या शेतकऱ्यांच्या नावाने विमा काढतात. हमखास अनुदान प्राप्त होत असल्याने कुठल्या पिकाचा विमा काढायचा हे माफिया ठरवतात.
७० नव्हे केवळ ३
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात एका गावात सुमारे ७० शेतकऱ्यांनी डाळिंब पिकाचा विमा काढल्याचे संकेतस्थळावर दिसत आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत केवळ तीन शेतकऱ्यांच्याच शेतात डाळिंब पीक आढळले.
पंधरा लाख लाटले
nसांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या नावावर लिंबू पीकविमा काढण्यात आला. प्रत्यक्ष पाहणीत तेथे सोयाबीन पीक होते. तपासाअंती विमा काढणारा शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील असल्याचे सिद्ध झाले.
nयात त्याला विम्याच्या अनुदानापोटी १ लाख २० हजार रुपये मिळाले होते. त्याची पूर्ण चौकशी केल्यानंतर त्याच्या अख्ख्या कुटुंबानेच पीकविमा काढल्याचे आढळले. त्यातून त्याने गेल्या वर्षी १५ लाख रुपये कमविले होते. प्रत्यक्षात तो शेतकरीही नव्हता.
nविमा कंपनीने त्याच्याकडून १ लाख २० हजार वसूल केले; पण त्यापूर्वीचे १५ लाख वसूल करता आले नाहीत.
जिल्हानिहाय तपासणी
जिल्हा तपासणी योग्य अयोग्य
नगर २९७ २८५ ७
धुळे २३८ २२० १८
नागपूर ३४ २८ ६
नाशिक १०१ ९९ २
सोलापूर २०२ १६६ ३२
रत्नागिरी २३७ २२१ ४
सिंधुदुर्ग ३६७ ३६१ ६
औरंगाबाद ७८६ ६९४ ९२
जालना ५९२७ ४८८२ १०४५
कोल्हापूर २७९ २३६ ४३
लातूर ४२३ ४१५ ८
सांगली १४९७ १०८१ ४१६
बीड ८५० ८४५ ५
जळगाव ८७७८ ८४७७ ३०१
नांदेड ८३६ ७८५ ५१
उस्मानाबाद ६२४ ५८९ १६
पुणे ४३९ २१७ २२२