नदी स्वच्छतेसाठी एकवटले प्रशासन, स्वयंसेवी संस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 01:27 PM2019-06-03T13:27:04+5:302019-06-03T13:35:49+5:30
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये शहरामधून वाहणाऱ्या नद्या, ओढे-नाल्यांची स्वच्छता हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे.
पुणे: शहराच्या जीवनवहिन्या म्हणून ओळख असलेल्या मुळा-मुठा व रामनदीला पुन्हा पूर्वीचे रुप देण्यासाठी व नद्यांच्या स्वच्छतेसाठी आता महापालिका प्रशासन, विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरिक एकत्र आले आहे. रविवार (दि.२) रोजी आयुक्त सौरभ राव यांनी आपल्या संबंधित सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी नदी, पर्यावरण, पाणी यादी विषयांवर काम करणा-या विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांनी मिळून औंध-बावधान येथील रामनदी पात्र आणि येथील जिवंत झ-याला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी नदी स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने महापालिकेचे सर्व विभागाचे अधिकारी एकत्र येऊन ठोस उपाय-योजना करतील, असे आश्वासन राव यांनी यावेळी दिले.
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये शहरामधून वाहणाऱ्या नद्या, ओढे-नाल्यांची स्वच्छता हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. यामुळेच महापालिका प्रशासनाने यावेळी शहरातील प्रामुख्याने मुळा-मुठा, रामनदीच्या स्वच्छचेसाठी मोठी मोहिम हाती घेतली आहे. यासाठी आयुक्तांनी संबंधित सर्व स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी यांची बैठक घेऊन स्वच्छ सर्वेक्षण, महापालिका करत असलेल्या उपाय-योजना व संस्थांकडून अपेक्षित कामांची माहिती दिली. यावेळी संस्थेच्या प्रतिनिधीने आयुक्तांना स्वत: काही ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्याची मागणी केली. त्यानुसार गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून दर रविवारी आयुक्त विविध ठिकाणी भेट देऊन नदी किनार, तेथे करावी लागणारी कामे याची माहिती घेत आहे. याचाच एक भाग म्हणून रविवार (दि.२) रोजी औंध, बावधन येथील रामनदीला भेट दिली.यावेळी जीवीत नदीच्या शैलजा देशपांडे, सागर मित्र, जल बिरादरीचे विनोद बावधनकर, जलदेवता सेवा अभियानाचे शैलेद्र पटेल, मिशन ग्राऊड वॉटरचे वैशाली पाटकर, रामनदी पुनरुज्जीवन करिता काम करणारे अनेक संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तसेच महापालिकेचे विविध विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
याबाबत जीवीत नदीच्या शैलजा देशपांडे यांनी सांगितले की, महापालिका प्रशासनाने स्वच्छ सर्वेक्षण अभियानामुळे तरी किमान आता नदी स्वच्छतेसाठी पाऊल उचचली आहेत. याबाबत आयुक्त राव सकारात्मक असून, त्यांनी दोन रविवार प्रत्येक्ष येऊन भेट दिली आहे. त्यानुसार विठ्ठल वाडी व अन्य ठिकाणी काही प्रमाणात काम सुरु केले असून, रामनदीसाठी आता पुढाकार घेतला आहे. महापालिका प्रशासन, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि महत्वाचे स्थानिक नागरिक एकत्र येऊन नदी स्वच्छतेचा विचार करत आहेत. यामुळे आपल्या शहरातील नद्यांमध्ये नक्कीच काहीतरी चांगला बदल घडले.