इंटिग्रेटेड बीटेक : करिअरचा एक नवा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:08 AM2021-07-15T04:08:32+5:302021-07-15T04:08:32+5:30
कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स), मेकॅनिकल इंजिनिअरिंग (रोबोटिक्स आणि ऑटोमेशन), इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (कृत्रिम ...
कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स), मेकॅनिकल इंजिनिअरिंग (रोबोटिक्स आणि ऑटोमेशन), इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग) यांसारख्या उद्योन्मुख विषयांमध्ये इंटिग्रेटेड बीटेक प्रोग्रॅम या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तावित आहेत. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून बारावीनंतरचे विद्यार्थीही थेट द्वितीय वर्षासाठी अर्ज करू शकतात.
सर्वसाधारणपणे, प्रोग्रॅम दोन भागांत विभागलेला आहे. या दरम्यान विद्यार्थी पदविका अभियांत्रिकीचा पहिला तीन वर्षांचा प्रोग्रॅम पूर्ण करतो आणि त्यानंतर तीन वर्षे तो पदवी अभियांत्रिकीचा प्रोग्रॅम पूर्ण करतो. ज्या विद्यार्थ्यांनी बारावीनंतर इंजिनिअरिंगचा मार्ग निवडला आहे, त्यापेक्षा इंटिग्रेटेड बीटेक या प्रकारचे शिक्षण असलेले विद्यार्थी तांत्रिकदृष्ट्या सरस असल्याचे दिसून येते.
सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी बांधकामाची गुणवत्ता तपासू शकतात आणि स्वतंत्रपणे साइट हाताळू शकतात. तसेच ते नवीनतम सर्वेक्षण साधने हाताळू शकतात. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील नेटवर्किंग, वेब डेव्हलपमेंट, तसेच मल्टिमीडिया अनिमेशन आदी कौशल्यात्मक कोर्सेसचा त्यात अंतर्भाव केला आहे. विद्यार्थी त्यांची स्वत:ची वेबसाइट तयार करू शकतात. तसेच नेटवर्कमध्ये दोषही शोधू शकतात.
इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशनचे विद्यार्थी सोल्डरिंग तसेच डिबगिंग ऑपरेशन्स करू शकतात. मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेचा विद्यार्थी स्वतंत्रपणे स्वत: ची बाइक, रेफ्रिजरेटर, स्प्लिट एसी यांसारखी घरगुती उपकरणांची देखरेख करू शकतो. तसेच या उपकरणांमध्ये नियमितपणे येणाऱ्या समस्या विद्यार्थी सोडवू शकतो. शासकीय महाविद्यालयामध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध नसला तरी काही खासगी विद्यापीठांमध्ये हा उपलब्ध आहे. त्यामुळे करिअरचा एक नवा पर्याय म्हणून त्याकडे पाहता येऊ शकते.
- प्रा. मंगेश महाजन, सहायक प्राध्यापक
----------------------