शहरात आरोग्य विभागाची घालमेल
By Admin | Published: August 28, 2014 04:30 AM2014-08-28T04:30:19+5:302014-08-28T04:30:19+5:30
संपूर्ण जगभरात खळबळ माजविणाऱ्या इबोला या जीवघेण्या आजाराने पिंपरी आणि पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचीही झोप उडविली आहे
पुणे : संपूर्ण जगभरात खळबळ माजविणाऱ्या इबोला या जीवघेण्या आजाराने पिंपरी आणि पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचीही झोप उडविली आहे. या आजाराचा वेगाने प्रसार होत असलेल्या देशांमधून पुणे आणि पिंपरीत आपल्या घरी परतलेल्या काही नागरिकांनी विमानतळावर उभारण्यात आलेल्या इबोला स्क्रिनिंग सेंटरवर चक्क चुकीचे मोबाईल क्रमांक दिले आहेत. त्यामुळे या नागरिकांच्या दैनदिंन आरोग्यावर पुढील २१ दिवस देखरेख ठेवण्यात आरोग्य विभागास अडथळे येत असल्याचे समोर आले आहे.
जीवघेण्या इबोलाचा प्रसार वेगाने होत असल्याने जागतिक आरोग्य संघटने जागतिक आरोग्य आणिबाणी घोषीत केली आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार झालेल्या देशांमधून इतर देशांमध्ये प्रवास करणाऱ्या अथवा मायदेशी परतणा-या नागरिकांची माहिती संबधित देशास कळविली जाते. विमानतळावरून घरी जाताना, या नागरिकांची संपूर्ण माहिती तसेच मोबाईल क्रमांक राज्याच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात आले होते. त्यानुसार, हे क्रमांक आणि या नागरिकांची माहिती पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागांना कळविण्यात आली. तसेच या नागरिकांशी दररोज संपर्क साधून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची तसेच त्यांना काही लक्षणे आढळल्यास तत्काळ रूग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी देण्यात आली.(प्रतिनिधी)