पुण्यात उन्हाची तीव्रता अधिक; गतवर्षीच्या तुलनेत एप्रिलमध्ये आठ हजारांनी वाढले टँकर
By निलेश राऊत | Published: May 10, 2024 08:45 PM2024-05-10T20:45:08+5:302024-05-10T20:45:20+5:30
मे महिन्यातील उन्हाचा तडाका वाढत असल्याने या टँकरच्या मागणीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत अधिक वाढ होईल असा अंदाज
पुणे : पुण्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत उन्हाची तीव्रता अधिक असल्याने, रोजच्या पाण्याची मागणी ४ ते ५ टक्क्यांनी वाढली आहे. तर दुसरीकडे टॅंकरच्या मागणीतही (पिण्याचे पाणी) वाढ झाली असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या एप्रिलमध्ये टँकर संख्या ७ हजार ९६० एवढ्या मोठ्या संख्येने वाढली आहे.
पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तीव्र उन्हाळ्यामुळे एप्रिल महिन्यात टँकरच्या फेऱ्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात शहरात ३३ हजार ६४३ टँकरच्या फेऱ्या झाल्या होत्या. त्या यावर्षी एप्रिलमध्ये ४१ हजार ६०३ इतक्या आहेत. विशेष म्हणजे महापालिकेकडून पिण्याचा पाण्याचा मोफत पाणीपुरवठा होत असतानाही, चलनाने म्हणजे विकतचे पाणी घेण्याचे प्रमाण यंदा या महिन्यात ७४२ ने वाढले आहे. गेल्यावर्षी महापालिकेच्या टँकर पॉइंटवरून ३ हजार ३२४ खाजगी टँकरने चलन भरून नागरिकांनी विकतचे पाणी घेतले होते. ते प्रमाण यंदाच्यावर्षी ४ हजार ६६ इतके आहे. दरम्यान मे महिन्यातील उन्हाचा तडाका वाढत असल्याने या टँकरच्या मागणीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत अधिक वाढ एप्रिलप्रमाणे होईल असा अंदाज आहे.
एप्रिल महिन्यातील टँकरच्या फेऱ्या (पिण्याचे पाणी)
महापालिकेचे स्वत:चे टँकर : ३ हजार १०६
महापालिका नियुक्त ठेकेदार टँकर : ३४ हजार ४३१
चलनाने भरलेले टँकर (विकतचे पाणी) : ४ हजार ६६