अतिदक्षता विभागात कोरोना रुग्णाने छेडले बासरीवर सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:11 AM2021-04-21T04:11:04+5:302021-04-21T04:11:04+5:30
पांडुरंग मरगजे धनकवडी : हल्ली ‘कोरोना’ आणि ‘मृत्यूचे भय’ हे दोन शब्द ‘समानार्थी’ झाले आहेत. परंतु कोरोनाचे भय बाळगण्यापेक्षा ...
पांडुरंग मरगजे
धनकवडी : हल्ली ‘कोरोना’ आणि ‘मृत्यूचे भय’ हे दोन शब्द ‘समानार्थी’ झाले आहेत. परंतु कोरोनाचे भय बाळगण्यापेक्षा हिमतीने त्याचा सामना केला तर अतिदक्षता विभागात उपचार घेणारा ज्येष्ठ व्यक्तीही कोरोनावर मात करू शकते. पोपट नामदेव कुंभार यांनी कोरोनाचा सामना करताना आजारावर मात केली आणि अतिदक्षता विभागातच बासरीवर सूर छेडले.
अतिदक्षता विभागात कुंभार (वय ७०) यांच्यावर एकीकडे कोरोनाचे उपचार सुरू होते. परंतु त्यांनी याही स्थितीमध्ये बासरीवर सूर छेडले आणि ‘जीवन गाणे गातच रहावे’ हा संदेश कोरोनाग्रस्त रुग्णांना दिला.
‘लोकमत’शी बोलताना महेंद्र कोंढरे म्हणाले की, मारुती कुंभार यांचे वडील पोपट कुंभार यांची कोविड १९ टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यातच त्यांना न्यूमोनिया असल्याने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. परंतु त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा न होता प्रकृती आणखी खालावत गेली. संसर्ग वाढल्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या कुंभार यांनी नगरसेविका स्मिता कोंढरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधला. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते सुधीर कोंढरे यांना मदतीची विनंती केली. कोंढरे यांनी धायरी येथील खासगी रुग्णालयात संपर्क साधून बेड उपलब्ध करून देण्याची विनंती केली. बेड उपलब्ध होताच मारुती कुंभार यांच्या वडिलांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
दरम्यान अतिदक्षता विभाग म्हंटले की, फक्त मॉनिटर्सचे आवाज, प्राणवायू मिळवण्यासाठी रुग्णांची चाललेली धडपड, डॉक्टरांची रुग्णांना वाचविण्यासाठी चाललेली प्रयत्नांची पराकाष्ठा हेच चित्र डोळ्यापुढे येते. पण या रुग्णालयात अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असलेल्या आणि कोविड पाॅझिटिव्ह निदान झालेल्या पोपट कुंभार यांनी उपचारातून वेळ मिळताच बासरीवर अनवट सूर छेडले आणि रुग्णालयातील वातावरणात चैतन्य संचारले. कुंभार यांच्या बासरीच्या सुराने जणू हेच सांगितले की, योग्य उपचार मिळाले तर अतिदक्षता विभागही सूरमयी होऊन जातो.
फोटो - पोपट कुंभार
फोटो - अतिदक्षता विभागात बासरीवादन करताना पोपट कुंभार.