खासगी शाळांकडून मनमानी शुल्क वसुली
By admin | Published: May 26, 2017 05:44 AM2017-05-26T05:44:50+5:302017-05-26T05:44:50+5:30
पूर्व हवेली परिसरात इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली भरमसाट शुल्क आकारणी करून पालकांची आर्थिक लूट केली जाते़
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव मूळ : पूर्व हवेली परिसरात इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली भरमसाट शुल्क आकारणी करून पालकांची आर्थिक लूट केली जाते़
संस्थाचालकांकडून शुल्क निर्धारणाचे नियम धाब्यावर बसवून पालक व शिक्षक संघाच्या सभा कागदोपत्री घेतल्या जात आहेत. संस्थाचालकांच्या मनमानी कारभारामुळे पालक चांगलेच कोंडीत सापडले आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार कोणत्याही शाळेला प्रवेशासाठी देणगी (डोनेशन) स्वीकारता येत नाही. शहरासह जिल्ह्यातील सर्व खासगी शाळांना हा कायदा लागू आहे. मात्र काही शाळांमध्ये याला तिलांजली देऊन विविध शुल्कांच्या नावाखाली पालकांची लूट सुरू आहे. विशेष म्हणजे, अनुदानित शाळांमध्येही
हा प्रकार सुरू आहे. विरोध केल्यास प्रवेश मिळणार नाही, या धास्तीमुळे कोणीही पालक तक्रार करण्यास धजावत नाहीत.
पुढील शैक्षणिक सत्र १५ जूनपासून सुरू होत आहे. परीक्षांचा हंगाम आटोपत आला असताना पहिलीच्या प्रवेशासाठी लगीनघाई सुरू झाली आहे. अनेक पालकांचा कल खासगी शाळांकडे आहे. मात्र काही संस्थांमध्ये छुप्या मार्गाने डोनेशन मागितले जाते. खासगी अनुदानित शाळांना शासकीय अनुदान असेल, तर सर्व विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश द्यावेत, असे शासनाचे निर्देश आहेत. पण, संस्थाचालक शाळेच्या दर्जाची जाहिरातबाजी करून विविध शुल्कांच्या नावाखाली पालकांची लूट करत असल्याची तक्रार काही पालक करत आहेत. याकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज पालकांनी व्यक्त केली आहे.