Maharashtra| राज्यातील ४ हजार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 10:56 AM2022-08-22T10:56:33+5:302022-08-22T11:00:02+5:30

हुचर्चित जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन अखेर बदल्या...

Inter-district transfers of 4 thousand teachers in the state | Maharashtra| राज्यातील ४ हजार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या

Maharashtra| राज्यातील ४ हजार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या

Next

पुणे : राज्यातील जिल्हा परिषदांतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांमध्ये आंतरजिल्हा बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. स्वयंचलित सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शुक्रवारपासून शनिवारी सकाळपर्यंत झालेल्या ३४ फेऱ्यांमध्ये तब्बल चार हजार शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक बदल्या ४७८ पालघर जिल्ह्यात तर सर्वात कमी ११ बदल्या नागपूर जिल्ह्यात झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यात ५५ बदल्या झाल्या आहेत. ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सोमवारी (दि. २२) बदल्यांच्या आदेशांचे प्रकाशन होणार आहे. त्यानंतर संबंधित शिक्षकांना ते आदेश मिळतील.

बहुचर्चित जिल्हा परिषदांच्या शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या अखेर झाल्या आहेत. यासाठी तयार केलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शुक्रवारी आणि शनिवारी जवळपास ३१ तासांत राज्यातील तब्बल ३ हजार ९४३ शिक्षकांच्या आंतरजिल्हा ऑनलाइन बदल्या करण्यात आल्या. या प्रक्रियेसाठी ७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयात नमूद केलेले नियम लागू करून सॉफ्टवेअर प्रणालीने प्रत्येक बदली कशी करावी, यासाठी निकष तयार करण्यात आले होते. यादृच्छिकपणे निवडलेल्या आणि नाकारलेल्या ५०० प्रकरणांचे नमुना लेखापरीक्षणदेखील पूर्ण झाले आहे.

सॉफ्टवेअर प्रणालीत जिल्ह्यांमध्ये साखळ्या तयार केल्यामुळे मोठ्या संख्येने शिक्षकांच्या बदल्या झाल्या. आता झालेले बदली आदेश या प्रणालीमध्ये एनक्रिप्शन अंतर्गत सध्या लॉक करण्यात आले असून, ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सोमवारी (दि. २२) त्याचे प्रकाशन होणार आहे. निकाल प्रकाशित होताच, प्रत्येक शिक्षकाला ई-मेलद्वारे बदलीचे आदेश दिले जातील. हे आदेश या नव्या प्रणालीमध्ये लॉगइन करून डाऊनलोडदेखील करता येणार आहे. तोपर्यंत बदली कुठे झाली हे संबंधित शिक्षकांना पाहता येणार नाही.

बदलीचा आदेश मिळाल्यानंतर, संबंधित शिक्षकाला नवीन ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करावे लागणार आहे. हा निर्णय प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर अवलंबून असेल. शिक्षण हक्क कायदा, २००९ च्या कलम २६ अन्वये - जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त असू शकत नाहीत.

जिल्हानिहाय बदल्या

नगर ८८, अकोला १७, अमरावती ४०, औरंगाबाद १७०, बीड १०२, भंडारा १९, बुलडाणा ७२, चंद्रपूर १०२, धुळे ७७, गडचिरोली ११९, गोंदिया ६४, हिंगोली ९१, जळगाव ११५, जालना १८९, कोल्हापूर ६४, लातूर १८, नागपूर ११, नांदेड ७४, नंदूरबार १३०, नाशिक १२९, उस्मानाबाद ३५, पालघर ४७८, परभणी ८४, पुणे ५५, रायगड २४९, रत्नागिरी ४०५, सांगली ९२, सातारा ६६, सिंधुदुर्ग ३६६, सोलापूर ६६, ठाणे ६५, वर्धा ३९, वाशिम ६०, यवतमाळ १९२

एकूण ३९४३

या बदल्या निष्पक्षपातीपणे झाल्या आहेत. त्यामुळे या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे प्रमाणही कमी असेल. शिक्षकांनी या नव्या यंत्रणेनुसार त्यांच्या बदली झालेल्या ठिकाणी रुजू व्हावे. यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पार पाडावी.

- आयुष प्रसाद, अध्यक्ष, शिक्षक बदली अभ्यासगट व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

Web Title: Inter-district transfers of 4 thousand teachers in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.