ग्रामपंचायतीच्या जागेची परस्पर विक्री, वडगाव कांदळी येथील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 02:11 AM2018-05-11T02:11:35+5:302018-05-11T02:11:35+5:30

कुंपणाने शेत खाल्ले या म्हणीप्रमाणे आदर्श सरपंच पुरस्कारप्राप्त झालेल्या कांदळी गावच्या माजी सरपंचाने गावच्या मालकीच्या २६ आर क्षेत्राचा खोटा साताबारा बनवून तिची विक्री केल्याची धक्कादायक बाब कांदळी गावच्या माजी उपसरपंचाने उघडकीस आणली आहे. 

Interactive Gram Panchayat land | ग्रामपंचायतीच्या जागेची परस्पर विक्री, वडगाव कांदळी येथील प्रकार

ग्रामपंचायतीच्या जागेची परस्पर विक्री, वडगाव कांदळी येथील प्रकार

Next

नारायणगाव - कुंपणाने शेत खाल्ले या म्हणीप्रमाणे आदर्श सरपंच पुरस्कारप्राप्त झालेल्या कांदळी गावच्या माजी सरपंचाने गावच्या मालकीच्या २६ आर क्षेत्राचा खोटा साताबारा बनवून तिची विक्री केल्याची धक्कादायक बाब कांदळी गावच्या माजी उपसरपंचाने उघडकीस आणली आहे. या माजी सरपंचाने फक्त सातबाराच नावावर केला नाही तर ४ आॅगस्ट २०१५ रोजी शासनाची जागेची परस्पर विक्री केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. हे प्रकरण उघडकीस येऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप कुठलीही कारवाई झाली नसल्याने या प्रकरणात महसूल विभागाचे कर्मचारी सामील असावेत अशी चर्चा सुरू आहे़ सध्या तरी हे प्रकरण जुन्नर तहसील कार्यालयात सुनावणीसाठी प्रलंबित आहे़
कांदळी येथील गावच्या जमिनीचा खोटा सातबारा तयार करून २६ आर क्षेत्राची विक्री केल्याप्रकरणी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या आदेशाने या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. कांदळी गावचे माजी उपसरपंच संग्र्राम फुलवडे आणि एस़ बी़ पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून गावची जागा बनावट सातबारा तयार करून विकल्याचे उघडकीस आले. फुलवडे व पाटील यांनी केलेल्या तक्रारीमध्ये कांदळीचे आदर्श पुरस्कार प्राप्त असलेले तसेच तंटामुक्तीच्या पुरस्काराबरोबर अनेक पुरस्कार मिळविणारे माजी सरपंच संतोष बढे यांनी आपल्या सरपंचपदाच्या काळात कांदळी गावचे हद्दीतील गट नं. १४१७ मधील १० गुंठे क्षेत्र निरंक होते़ तसेच गट नं़ १४२१मधील १ गुंठा क्षेत्रात धर्मशाळा होती. गट नं़ १४२२ मध्ये ५ गुंठे क्षेत्रात बंगल्याकडे जाणारा भाग म्हणून ओळखला जायचा तर स़ नं़ २९३मध्ये ९ गुंठे क्षेत्र सडकेकडे (बोटीचा धक्का) असा उल्लेख असलेले एकूण २५ आर क्षेत्राचा प्रत्यक्षात २६ क्षेत्राचा सातबारा बनविला़ हा सातबारा तयार झाल्यानंतर या क्षेत्राची विक्री दि़ ४ आॅगस्ट २०१५ रोजी खरेदीखताद्वारे दत्ता गुलाबराव घाडगे यांना रक्कम रु. ६,१०,००० यास विक्री केली़ ही जागा पुणे-नाशिक महामार्गावर मोक्याच्या ठिकाणी असल्याने त्याची प्रत्यक्षात विक्री मोठ्या रकमेमध्ये झाल्याची चर्चा सुरू आहे़ संपूर्ण तालुक्यात सातबारांची आॅनलाईन प्रक्रिया सुरू असताना तलाठी सैद यांना या जागेसंदर्भात संशय आला़ त्यांनी या जागेबाबतच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर सातबारा बनावट करून त्याच्यावरील फेरफार नंबर हा दुसऱ्या व्यक्तीचा असल्याचे निष्पन्न झाले़ पूर्वीच्या सातबारावर कोणत्याही मालकाचे नाव नसून निरंक असा उल्लेख आहे़ तत्कालिन सरपंच बढे यांनी बनावट सातबारा बनविल्यानंतर या क्षेत्रावर एका पतसंस्थेचे २५ लक्ष रुपये कर्ज देखील काढले होते़ हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर माजी उपसरपंच संग्राम फुलवडे यांनी या प्रकरणाबाबत चौकशीची मागणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे़

-माजी उपसरपंच संग्राम फुलवडे म्हणाले, की या जागेच्या सातबारावर निरंक असा उल्लेख असल्याने ही जागा कोणाची आहे, हे प्रथम स्पष्ट करावे, पूर्वी या ठिकाणी धर्मशाळा होती, त्याची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभाग करीत होते, की महसूल विभाग हे स्पष्ट करावे अशी मागणी तहसीलदार जुन्नर यांच्याकडे केलेली आहे. या जागेचा अपहार करणाºयावर प्रथम फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे ़
- याबाबत कांदळीचे तलाठी संजय सैद म्हणाले की, या जागेच्या संदर्भात तक्रारी अर्ज आल्यानंतर २० वर्षांची माहिती घेतली असता या जागेचा सातबारा निरंक असा आहे़ याबाबत भूमिअभिलेख विभागात चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची नोंद आढळून आली नाही़ हा सदरचा सातबारा निरंक असताना त्याचे खरेदीखत कसे झाले, याबाबतची चौकशी सुरू आहे़
- जुन्नरचे तहसीलदार किरण काकडे म्हणाले, की ही जागा गायरान नाही परंतु रस्त्याच्या कडेची पडजमीन आहे़ या संदर्भात संबंधित व्यक्तीला नोटीस काढण्यात आली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे़

Web Title: Interactive Gram Panchayat land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.