ग्राहक पंचायतीमुळे मिळाले व्याजाचे हक्काचे पैसे; बँकेने आधी दुर्लक्ष मग मान्य केली चूक
By राजू इनामदार | Published: August 18, 2023 06:36 PM2023-08-18T18:36:26+5:302023-08-18T18:37:49+5:30
त्यानंतर ग्राहक पंचायतीने यासंदर्भात बँकेच्या थेट वरिष्ठ कार्यालयाबरोबर संपर्क साधल्यावर मात्र चूक मान्य करत दिलगिरी तर व्यक्त केलीच शिवाय जास्तीची रक्कमही ग्राहकाला परत दिली...
पुणे : गृहकर्ज देताना ग्राहकाने व्याजदरासाठी दिलेला फ्लोटिंग रेटचा पर्याय अमलात न आणता फिक्स रेटप्रमाणे व्याज घेतले. ही चूक लक्षात आल्यानंतर ग्राहकाने मागणी करूनही त्यात बदल केला नाही. त्यानंतर ग्राहक पंचायतीने यासंदर्भात बँकेच्या थेट वरिष्ठ कार्यालयाबरोबर संपर्क साधल्यावर मात्र चूक मान्य करत दिलगिरी तर व्यक्त केलीच शिवाय जास्तीची रक्कमही ग्राहकाला परत दिली.
रुचिता शाह यांनी सन २०१७ मध्ये एका नामवंत बँकेकडून गृह कर्ज घेतले. कर्ज घेतानाच त्यांनी व्याजदरासाठी फ्लोटिंग रेट ( म्हणजे व्याजदर जसे बदलतील त्याप्रमाणे) असा पर्याय दिला होता. बँकेने त्याप्रमाणे कृती न करता फिक्स रेट (कर्ज घेतानाचा व्याद दर कायम) प्रमाणे त्यांच्याकडून व्याज घेतले. शाह यांनी फ्लोटिंग रेटप्रमाणे हिशोब केल्यानंतर बँकेनेच त्यांना मोठी रक्कम देणे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बँकेकडे तशी मागणी केली. कागदपत्रे दाखवली. मात्र बँक प्रशासनाने त्यांना करू, पाहू, अर्ज द्या असे म्हणत टोलवत ठेवले.
अखेरीस कंटाळून शाह यांनी ग्राहक पंचायतीबरोबर संपर्क साधला. अध्यक्ष विलास लेले यांची भेट घेतली. त्यांना सर्व कागदपत्रे दाखवली. म्हणणे सांगितले व बँकेच्या विरोधात न्यायालयात दाद मागायची असल्याचे स्पष्ट केले. लेले यांनी पंचायतीच्या कामकाज पद्धतीप्रमाणे बँकेच्या थेट वरिष्ठ कार्यालयाबरोबर संपर्क साधला. पत्राद्वारे त्यांनी सर्व माहिती सविस्तर कळवली. बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात प्रशासनाने केलेली चूक आली. त्यांनी तातडीने शाह यांच्याकडे चूक मान्य केली. दिलगिरी व्यक्त केली तसेच फ्लोटिंग रेटच्या हिशोबाप्रमाणे होत असलेली मोठी रक्कमही त्यांच्या खात्यावर जमा केली. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर बँकेला नक्कीच यापेक्षा जास्त भरपाई द्यावी लागली असती, मात्र पंचातयीचे काम आधी सौम्यपणे, नंतर कायद्याप्रमाणे असे असते. त्यामुळे साध्या पत्रानंतरही ही समस्या सुटली असे लेले यांनी सांगितले.