वर्क फ्रॉम होम काम करण्यासाठी इच्छूक आहात का? महिलेला गंडा, १७ लाख लुटले
By भाग्यश्री गिलडा | Updated: July 24, 2023 15:29 IST2023-07-24T14:57:23+5:302023-07-24T15:29:43+5:30
महिलेला लिंकद्वारे टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यास सांगून वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगितले

वर्क फ्रॉम होम काम करण्यासाठी इच्छूक आहात का? महिलेला गंडा, १७ लाख लुटले
पुणे: टेलिग्रामवर लिंक पाठवून टास्क पूर्ण केल्यास लाखो रुपये कमिशन मिळेल असे सांगून एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी औंध परिसरात राहणाऱ्या एका ४४ वर्षीय महिलेने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १८ एप्रिल २०२३ ते २ मे २०२३ दरम्यान घडली. तक्रारदार महिला यांच्या व्हाट्सअप वर पार्ट टाइम आणि वर्क फ्रॉम होम काम करण्यासाठी इच्छूक आहात का? असा मेसेज आला. महिलेने सहमती दर्शवल्यानंतर त्यांना एक लिंक पाठवण्यात आली. लिंकद्वारे टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यास सांगून वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगितले. या टास्क पूर्ण करतांना पैसे गुंतवल्यास अधिक नफा मिळेल अशी वेगवेगळी कारणे सांगून महिलेकडून तब्बल १६ लाख ९१ हजार ९२८ रुपये उकळले. मात्र सांगितल्याप्रमाणे पैसे भरून सुद्धा त्यांना कमिशन देण्यात आले नाही. आणि कालांतराने त्यांना ग्रुपमधून काढून टाकण्यात आल्याने फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जानकर करत आहेत.