इच्छुकांनी कसली कंबर

By admin | Published: January 11, 2017 03:06 AM2017-01-11T03:06:13+5:302017-01-11T03:06:13+5:30

सांगवी व पिंपळे गुरव परिसरात प्रचाराची चढाओढ आणि स्पर्धात्मक राजकारण बघायला मिळत असून, अनेक दिग्गज आणि मुरलेले राजकारणी कंबर कसून प्रचारास लागले आहेत.

Interested waist | इच्छुकांनी कसली कंबर

इच्छुकांनी कसली कंबर

Next

सांगवी : सांगवी व पिंपळे गुरव परिसरात प्रचाराची चढाओढ आणि स्पर्धात्मक राजकारण बघायला मिळत असून, अनेक दिग्गज आणि मुरलेले राजकारणी कंबर कसून प्रचारास लागले आहेत.
वार्डची विभागणी आणि अनेक नवे चेहरे पुढे आल्याने सांगवी परिसरात संशयकल्लोळ झाला आहे. या द्विधा परिस्थितीने जनतेचे डोके चक्रावून गेले आहे. परिसरातील मुख्य वार्ड ३१ मधून भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस अशी सरळ लढत दिसून येत आहे. जुन्या सांगवीतील प्रत्येक उमेदवार विकासकामांचे श्रेय आपलेच असे म्हणून जागोजागी फ्लेक्स लावून जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.
नवीन उमेदवार राजकारणाची चव घेण्यासाठी स्पर्धेत उतरले असून, घरोघरी जाऊन मतदारांना भेटी देण्यापासून लग्न, वाढदिवसापर्यंत जनतेची काळजी घेताना उमेदवार दिसत आहेत. रस्त्याने जाताना ढुंकूनही न पाहणारे नेते आस्थेवाईकपणे जनतेची विचारपूस करताना दिसत आहेत. कामाचा वेग वाढवून जनतेच्या मुख्य गरजा लक्षात घेऊन विद्यमान नेते अनेक विकासकामे करताना दिसत आहेत. त्यामुळे नवीन रस्ते, चौकांचे सुशोभीकरण, पथदिवे सगळे काही अचानक बदलले असून, परिसराला चांगले दिवस आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शहराच्या राजकारणात सांगवीची निर्णायक भूमिका असते. पूर्वी होणाऱ्या मारामाऱ्या, गॅँगवॉर आणि चढाओढ यावर नियंत्रण ठेवण्याची कसरत मात्र पोलीस प्रशासनाला करावी लागणार आहे. काही भागात भावकी-गावकीचा नारा दिला जात आहे. काही भागात दादागिरी, पैसा यानेही डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. निवडणूक तोंडावर आल्याने फोडाफोडीच्या राजकारणालाही जोर आला आहे. पक्षात वागणूक चांगली मिळत नाही असा अचानक साक्षात्कार झाल्यासारखे अनेकजण पक्ष सोडत आहेत.
नेत्यांच्या फोडाफोडीला सध्या उधाण आले आहे. त्यामुळे मात्र, मतदारांचा गोंधळ उडत आहे. या सर्व घडामोडीत मात्र, पक्षाचा कार्यकर्ता भरडून निघत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. प्रचाराच्या हायटेक यंत्रणा, मजुरीवरील कार्यकर्ते, फोडाफोडीचे राजकारण यांमुळे यंदाची महापालिका निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. जनताही या उमेदवारांची केविलवाणी धडपड पाहून मत कोणाच्या पारड्यात टाकते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (वार्ताहर)

जाधववाडीत नागरिकांवर छाप पाडण्याकरिता फंडे

 जाधववाडी : निवडणुका जवळ आल्याने नागरिकांशी जवळीक साधण्याकरिता रोज नवनवे हातखंडे वापरताना सध्या इच्छुक उमेदवार दिसत आहेत. अगदी सकाळपासूनच प्रभागातील नागरिकांच्या गाठीभेटी घेत लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोण आधुनिक श्रावण बाळ होत नागरिकांना तीर्थक्षेत्रे फिरवून आणीत आहे, तर कोणी शासनाने दिलेली आधार कार्ड स्मार्ट करून देण्याचा स्मार्ट प्रयत्न करताना दिसत आहे .
 प्रभागरचना बदलल्याने इच्छुकांसहित ज्यांनी नगरसेवकपद भोगलेय तेही खडबडून जागे झाले आहेत. जे पाच वर्षांत जेवढे जमले तेवढे काम केले. जी कामे राहिली असतील, ती कामे आता पुढे करून दाखवेन फक्त मलाच मत द्या, असे विनवीत आहेत. काही स्वयंघोषितांनी आपणच नगरसेवक होणार अशा आशयाचे फलक वाहनांवर व कार्यालयाबाहेर लावले आहेत. जागोजागी जनसंपर्क कार्यालये थाटून ठेवली असली, तरी कार्यालये मात्र ओस आहेत.
गल्लीबोळातील डांबरी रस्ते चकाचक झाले. अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट झाला आहे. पण काही ठिकाणच्या जुनाट समस्या ‘जैसे थे’ आहेत. पालिकेचे रुग्णालय नाही, क्रीडांगण नाही, काही ठिकाणी सार्वजनिक शौचालये नाहीत. आवश्यक तेथे गतिरोधक नाहीत. मरणारे मरतात, सिग्नल नाहीत. अवैध दारू विक्री,अवैध प्रवासी वाहतूक, ससेहोलपट, ड्रेनेज समस्या कधी सुटणार, या विवंचनेत मतदार आहेत.

Web Title: Interested waist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.