हडपसरमध्ये '४० लाखांचे गाढव विकणे आहे' : काय आहे ही भानगड घ्या जाणून !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 05:41 PM2018-12-19T17:41:08+5:302018-12-19T17:41:19+5:30
पुण्यात सध्या ४० लाखांचे गाढव विकणे आहे ही जाहिरात धुमाकूळ घालताना दिसत आहे.
पुणे : पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. याच पुण्यात सध्या ४० लाखांचे गाढव विकणे आहे ही जाहिरात धुमाकूळ घालताना दिसत आहे. पुण्यात लागलेली ही जाहिरात सध्या सोशल मीडियावर हिट झाली असून हडपसरकरांचे लक्ष वेधून घेत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील हडपसर भागात ४० लाखांचे गाढव विकणे आहे अशी पोस्टरबाजी अज्ञात व्यक्तीने केली आहे. गंमत म्हणजे यात गाढव म्हणजे प्रत्यक्ष गाढव प्राणी नसून 'रेल्वेचे गेट' आहे. शहरातील मुख्य उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हडपसरमधील ससाणेनगर-सैय्यदनगर येथे वर्षभरापूर्वी बसवण्यात आलेले रेल्वे गेट एका वर्षात पाच वेळा बिघडल्याचे दिसून आले. लाखो रुपये खर्च करून बसवलेले हे गेटरुपी गाढव विकणे अशी पोस्टर लागली असून त्याची नागरिकही थांबून दखल घेताना दिसत आहेत.
दरम्यान स्थानिक आमदार योगेश टिळेकर यांच्या आमदार निधीतून हे गेट बसवले आहे. मात्र त्यात अनेकदा तांत्रिक बिघाड होत असल्याने नागरिकांना वारंवार वाहतूक कोंडीचा अनुभव घ्यावा लागतो. त्यामुळे रेल्वे गेटवर अडकणारे सर्व त्रस्त नागरिक अशा नावाने हे पोस्टर लागले आहे. हे पोस्टर कोणी लावले याची चर्चा हडपसर परिसरात रंगली आहे. आगामी निवडणुकांच्यादृष्टीने सुरु झालेली ही अज्ञात पोस्टरबाजी कुठेपर्यंत जाते हेच बघणे औसुक्याचे ठरणार आहे.