छंद जन्म-मृत्यूचे दाखले जमविण्याचा
By admin | Published: September 12, 2016 02:02 AM2016-09-12T02:02:24+5:302016-09-12T02:02:24+5:30
नावात गुप्ते, पण जन्म-मृत्यूच्या दाखल्यांची अचूक माहिती शोधण्याचा ‘अमेय’ छंद एका तरुणाने जोपासला आहे. राष्ट्रपुरुष, समाजसुधारक, ज्येष्ठ लेखक, साहित्यिक यांच्या जन्म-मृत्यूचा दाखला
योगेश्वर माडगूळकर ल्ल पिंपरी
नावात गुप्ते, पण जन्म-मृत्यूच्या दाखल्यांची अचूक माहिती शोधण्याचा ‘अमेय’ छंद एका तरुणाने जोपासला आहे. राष्ट्रपुरुष, समाजसुधारक, ज्येष्ठ लेखक, साहित्यिक यांच्या जन्म-मृत्यूचा दाखला माहिती अधिकारातून (आरटीआय) मिळविण्याचे काम ते अव्याहतपणे करत आहेत. अमेय गुप्ते असे या तरुण अवलियाचे नाव आहे. आत्तापर्यंत त्यांनी जवळपास ४० जणांचे दाखले त्यांच्या मूळ गावी जाऊन मिळविले आहेत.
गुप्ते सध्या तळेगावमध्ये राहतात. जन्म-मृत्यूच्या दाखल्यांना असणारे महत्त्व लक्षात घेऊन ज्येष्ठ साहित्यिकांचे जन्म-मृत्यूचे दाखले जमा करण्याचा छंद त्यांनी जोपासला आहे. आत्तापर्यंत त्यांनी साहित्यिकांच्या मूळ गावी जाऊन जन्मदाखले, तर मुंबई, पुणे आणि कोल्हापूर महापालिकेतून मृत्यू दाखले शोधले आहेत. त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून ते पत्रव्यवहार करीत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, फिरोजशहा मेहता, दादाभाई नौरोजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर, मास्टर विनायक, दादासाहेब रेगे, संगीतकार सी. रामचंद्र, वसंत देसाई, पु. ल. देशपांडे, राम गणेश गडकरी, गदिमा यांच्यासह अनेक जणांचे जन्म-मृत्यूचे दाखले त्यांच्या संग्रही आहेत.
लोकमान्य टिळक यांचा १ आॅगस्ट १९२० रोजी मुंबईमध्ये मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची नोंद मुंबई महापालिकेत आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जन्माचा दाखला मिळविण्यासाठी त्यांनी जळगाव नगरपालिकेकडे माहिती अधिकारातून अर्ज केला होता. त्यानुसार त्यांच्या जन्माची नोंद आहे.
गुप्ते म्हणाले, ‘‘विश्वकोशात अनेक चुका सापडल्या. त्यात दीनानाथ मंगेशकर, फिरोज शहा मेहता यांची जन्मतारीख चुकीची आहे. ही बाब विश्वकोश मंडळाच्या
लक्षात आणून दिली. त्यानंतर नागरिकांसमोर खरी माहिती
यावी, यासाठी प्रयत्न सुरूकेले. तेव्हापासून अनेक साहित्यिकांचे आणि मान्यवरांचे जन्मदाखले शोधण्याचे वेड सुरू केले आहे.’’