इंटेरिअर डिझाइन : मूलभूत तत्त्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:09 AM2021-05-01T04:09:54+5:302021-05-01T04:09:54+5:30

रंगसंगतीबरोबरच योग्य त्या मटेरियलचा (साहित्य) वापर करावा. आपण इथे फिनिशिंग मटेरियल (आवरण साहित्य) याबद्दल बोलत आहोत. लॅमिनेट, पोलिश, टॆक्सश्चर, ...

Interior Design: Fundamentals | इंटेरिअर डिझाइन : मूलभूत तत्त्वे

इंटेरिअर डिझाइन : मूलभूत तत्त्वे

googlenewsNext

रंगसंगतीबरोबरच योग्य त्या मटेरियलचा (साहित्य) वापर करावा. आपण इथे फिनिशिंग मटेरियल (आवरण साहित्य) याबद्दल बोलत आहोत. लॅमिनेट, पोलिश, टॆक्सश्चर, नैसर्गिक दगड (नॅचरल स्टोन्स), फॅब्रिक (कापड) इत्यादी मटेरियल्स हे तुमच्या फर्निचर, सोफा, पडदे, फ्लोरिंग, सॅनिटरीवेअर, दरवाजे-खिडक्या यांना पूर्णत्व देतात.

मटेरियल आणि रंग यांचे संयोजन करून आणि काही ठिकाणी पॅटर्नचा वापर करून तुम्ही एखाद्या भिंतीला किंवा पृष्ठभागाला (सरफेस) सुंदर रूप देऊ शकता.

मटेरिअल्सचा वापर करून तुम्ही एक महत्त्वाचे तत्त्व पूर्ण करू शकता आणि ते म्हणजे ऱ्हिदम.

ऱ्हिदम हे कुठल्याही डिझाइनचा अविभाज्य भाग असतो. जसा संगीतामध्ये ताल असतो तसाच इथे डिझाइनचा ऱ्हिदम (ताल) असतो. एखादा रंग, आकार, टेक्सश्चर किंवा पॅटर्नमुळे तुम्ही हे साध्य करू शकता. ऱ्हिदममध्ये बऱ्याच वेळा पुनरावृत्ती केली जाते.

मोराच्या पंखांमध्ये प्रत्येक पीस ऱ्हिदम तत्त्वामुळे त्या पिसाऱ्याला आकर्षक बनवते. कपाटाचे एकसारखे कप्पे, पेंटिंगचे कोलाज, उभ्या किंवा आडव्या रेषा यांचा पुन्हा पुन्हा वापर हीसुद्धा ऱ्हिदमची उदाहरणे.

बॅलन्स म्हणजे संतुलन हे डिझाइनचे अजून एक तत्त्व आहे. जसा तराजूमध्ये समान वजन संतुलन देते, तसेच डिझाइनमध्ये समान वजन द्यावे लागते. मात्र इथे वजन हे दृश्य वजन (व्हिज्युअल वेट) असते. म्हणजे एखादा आकार किंवा रंग यांना दृश्य वजन जास्त असते. उदाहरणार्थ, गडद रंग ह्यांचे दृश्य वजन जास्त असते.

बॅलन्स (संतुलन) हे सिमेट्रिकल (सममितीय), असिमेट्रिकल (असममितीय) किंवा रेडिअल (गोलाच्या केंद्राभोवती) असे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात.

हार्मोनी (सुसंवाद) हे तत्त्व समजायला जरी अवघड असले तरी तेवढेच महत्त्वाचे. सुसंवाद हा नेहमीच शांत भावना निर्माण करतो. डिझाइन हार्मोनी सुद्धा काही तसेच असते. इंटेरिअरमध्ये वापरलेले रंग आणि वस्तू यांचा एकमेकांमध्ये सुसंवाद एक सुखद अनुभव निर्माण करतो. निसर्गामध्ये हार्मोनीचे सोपं उदाहरण म्हणजे समुद्रकिनारा. रेती सहज पाण्यामध्ये संपते आणि पाणी जणू सहज आकाशात मिसळून जाते, ह्यालाच हार्मोनी (सुसंवाद) म्हणतात.

विविध वस्तू आणि रंग एकाच्या बाजूला एक ठेवून त्या एकमेकांसोबत कसा संवाद साधतात ह्याचा अभ्यास करावा लागतो, तेव्हाच हार्मोनी तत्त्व डिझाइनमध्ये जाणवू लागते.

कदाचित डिझाइनचे सर्वात महत्त्वाचे तत्त्व आहे प्रोपोर्शन आणि स्केल अर्थात तुलनात्मक प्रमाण. डिझाइनमध्ये वापरलेले आकार यांची एकमेकांसोबत तुलना केली तर ती ढोबळपणे दृश्य स्वरूपात चांगली दिसली पाहिजे. पण हा अंदाज तुम्हाला गोल्डन रेशोचा अभ्यास केला तर पटकन लावता येईल. गोल्डन रेशो हा सर्वमान्य नियम आर्किटेक्ट आणि इंटेरिअर डिझायनर वापरतात आणि प्रोपोर्शन आणि स्केलचे तत्त्व साधतात. गोल्डन रेशोमध्ये दोन विविध प्रमाणांची तुलना केली जाते.

(a b) / a = a / b . इथे a हे मोठे आणि b हे छोटे प्रमाण आहे. गोल्डन रेशोचा आकडा आहे १.६१८

इम्फासिस आणि स्टाईल (भर आणि शैली) हेसुद्धा लक्षात ठेवावे असे तत्त्व. इम्फासिसमध्ये तुम्ही डिझाइनमध्ये कोणत्याही एका आकाराला, रंगाला किंवा स्पेसला इम्फासाईझ करता (हायलाईट करता). उदाहरणार्थ, संपूर्ण इंटिरियर पांढरे असले आणि सोफा निळा केला तर त्यावर तुम्ही भर दिला.

स्टाईल म्हणजे तुम्ही एका विशिष्ट पद्धतीचे आकार, नक्षीकाम, रंग यांची निवड करता. स्टाईलचेसुद्धा विविध प्रकार आहेत. मिनिमलिस्ट, कन्टेम्पररी, मॉडर्न, आर्ट डेको, रस्टिक, स्कँडिनेव्हियन, इंडस्ट्रियल आणि अनेक स्टाईल्स आहेत तुम्हाला निवड करायला. एकदा आवड निर्माण झाली की इंटिरियर डिझाइनमध्ये खूप आहे समजून घेण्यासारखं हे तुम्हाला लक्षात आलंच असेल.

Web Title: Interior Design: Fundamentals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.