जेव्हा डॉक्टर हातात झाडू घेतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 02:17 PM2018-06-15T14:17:18+5:302018-06-15T14:17:18+5:30
राज्य सरकारने विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या अनिश्चितकालीन संपामध्ये पुण्यातील ससून रुग्णालयातील बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर सहभागी झाले आहेत. हे डॉक्टर आपला विरोध गांधीगिरीच्या मार्गाने दाखवत असून रक्तदान करून झाल्यावर त्यांनी ससूनच्या परिसराची स्वच्छता केली आहे.
पुणे : राज्य सरकारने विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या अनिश्चितकालीन संपामध्ये पुण्यातील ससून रुग्णालयातील बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर सहभागी झाले आहेत. हे डॉक्टर आपला विरोध गांधीगिरीच्या मार्गाने दाखवत असून रक्तदान करून झाल्यावर त्यांनी ससूनच्या परिसराची स्वच्छता केली आहे.
राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना सध्या सहा हजार रुपये विद्यावेतन मिळते. मात्र प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना ११ हजार रुपये विद्यावेतन देण्याच्या २०१५ साली घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची आहे. या डॉक्टरांनी गेल्या तीन दिवसांपासून काम थांबवले असून मागण्या पूर्ण होईपर्यंत संप करण्यावर ते ठाम आहेत. सध्या उत्तर प्रदेशमध्ये १७ हजार ९०० , कर्नाटकमध्ये १९ हजार ९७५, पश्चिम बंगालमध्ये २१हजार, बिहारमध्ये १५ हजार, छत्तीसगढ, ओरिसा, आसाम आणि केरळमध्ये दरमहा २० हजार रुपये इतके विद्यावेतन दिले जाते. पुण्यातील ससून रुग्णालयात अंदाजे २०० प्रशिक्षणार्थी डॉक्टर असून त्यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र तसे काही चित्र नसून अपवाद वगळता ससूनच्या रुग्णांना फारशी अडचण येताना दिसत नाही. यापूर्वी या डॉक्टरांनी रक्तदान करून सरकारचा निषेध नोंदवला असून ९० बाटल्या रक्त ब्लड बँकेत जमा केले आहे.