आंतरक्लब टेनिस : पीवायसी ‘अ’ चॅम्पियन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 03:37 AM2018-05-07T03:37:20+5:302018-05-07T03:37:20+5:30
पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटनेतर्फे (पीएमडीटीए) आयोजित सातव्या शशी वैद्य स्मृती आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत इलिट गटात डेक्कन ‘अ’ला २३-११ने नमवित पीवायसी ‘अ’ने रविवारी विजेतेपदाला गवसणी घातली.
पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटनेतर्फे (पीएमडीटीए) आयोजित सातव्या शशी वैद्य स्मृती आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत इलिट गटात डेक्कन ‘अ’ला २३-११ने नमवित पीवायसी ‘अ’ने रविवारी विजेतेपदाला गवसणी घातली.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या टेनिस कोर्टवर ही स्पर्धा झाली. अंतिम फेरीत पीवायसी अ संघाने डेक्कन अ संघावर १२ गुणांच्या फरकाने सरशी साधत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. १०० वर्षांपुढील गटात पीवायसीच्या डॉ. अभय जमेनिस व केदार शहा या जोडीला डेक्कनच्या नंदन बाळ व जयदीप दाते यांनी ५-६ (१-७)असे पराभूत केले. नंतर खुल्या गटात पीवायसीच्या केतन धुमाळने अभिषेक ताम्हाणेच्या साथीत डेक्कनच्या ऋषिकेश पाटसकर व संग्राम चाफेकर यांच्यावर ६-२ अशा फरकाने विजय मिळवित संघाला ११-८ने आघाडी मिळवून दिली.
त्यानंतर ९० वर्षांपुढील गटात पीवायसीच्या जयंत कढे व ऋतू कुलकर्णी यांनी डेक्कनच्या अजय कामत व मदन गोखले यांचा ६-१ असा पराभव करून आपल्या संघाला विजेतेपदाच्या मार्गावर आणून ठेवले. खुल्या गटात केदार शहा व प्रशांत सुतार यांनी डेक्कनच्या विक्रांत साने व मंदार वाकणकर या जोडीचा ६-२ असा सहज पराभव करून पीवायसीच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
विजेत्या पीवायसी ‘अ’ संघाला शशी वैद्य स्मृती चषक व ४०००० रुपये, तर उपविजेत्या डेक्कन ‘अ’ संघाला चषक व २०००० रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर आणि पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव कुमार ताम्हाणे यांच्या हस्ते झाले. पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे यांनी सुत्रसंचालन केले.
निकाल : इलिट गट : अंतिम फेरी :
पीवायसी ‘अ’ वि.वि. डेक्कन ‘अ’ : २३-११ (१०० वर्षांपुढील गट : डॉ. अभय जमेनिस/केदार शहा पराभूत वि. नंदन बाळ/जयदीप दाते ५-६ (१-७). खुला गट : केतन धुमाळ/अभिषेक ताम्हाणे वि.वि. ऋषिकेश पाटसकर/संग्राम चाफेकर ६-२. ९० वर्षांपुढील गट : जयंत कढे/ऋतू कुलकर्णी वि.वि. अजय कामत/मदन गोखले ६-१. खुला गट : केदार शहा/प्रशांत सुतार वि.वि. विक्रांत साने/मंदार वाकणकर ६-२).