गहुंजे क्रिकेट सामन्याच्या बेटिंग प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:11 AM2021-04-28T04:11:56+5:302021-04-28T04:11:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : गहुंजे येथील क्रिकेट मैदानावर भारत व इंग्लंड या संघांदरम्यान झालेल्या सामन्यावर बेटिंग घेतल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : गहुंजे येथील क्रिकेट मैदानावर भारत व इंग्लंड या संघांदरम्यान झालेल्या सामन्यावर बेटिंग घेतल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नागपूरमधून कमाल खान याला अटक केली आहे बेटिंगच्या दुनियेतील बादशहा असे त्याला म्हटले जाते. त्याच्यासह पिंपरीतील आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे यातील एकूण अटक आरोपींची संख्या ४६ झाली आहे.
बेटिंगचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचे दिसून येत असून, त्याबाबत पोलिसांनी बीसीसीआयला माहिती दिली आहे. या बुकींच्या संपर्कात कोणी क्रिकेटपटू होता का, तसेच एखाद्या क्रिकेटपटूमार्फत मॅच फिक्सिंगसारखा प्रकार केला आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
कमल जहांगीर मोहम्मद ऊर्फ कमल खान (वय ४८, रा. जाफरनगर, नागपूर) व दिनेश पलाजराय बदलानी (वय ३६, रा. पिंपळे सौदागर, पिंपरी-चिंचवड), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना वडगाव मावळ न्यायालयाने २ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
यापूर्वी अटक करण्यात आलेले ४४ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने ही कामगिरी केली. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, गहुंजे स्टेडियमवर २६ मार्च २०२१ रोजी भारत व इंग्लंड यांच्यात क्रिकेटचा एकदिवसीय सामना झाला. त्या वेळी आरोपी मोबाइल ॲप्सच्या माध्यमातून बेटिंग घेत होते. त्यावेळी पोलिसांनी ३३ आरोपींना पकडून त्यांच्याकडून ४५ लाख ३७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. १२ बेटिंग ॲप्स, ती तयार करून त्याचा आयडी व पासवर्ड विकणाऱ्या ३२ आरोपींची नावे निष्पन्न झाली. त्यात मुंबई, नागपूर व उल्हासनगर येथून काही आरोपींना अटक केली.
विविध राज्यांतील बुकींची नावे निष्पन्न
या प्रकरणात विविध राज्यांतील मोठमोठ्या बुकींची नावे निष्पन्न झाली आहेत. तसेच कॅरेबियन बेटांमधील सेंट लुसीया या देशातील एका आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावरील कर्मचारी असलेला जॉन हा अटक केलेल्या आरोपींपैकी एकाच्या संपर्कात असल्याचे व त्याने क्रिकेट सामन्याचे फोटो बुकींना पाठवल्याचे आढळून आले. जॉन हा बेटिंगच्या व्यवहारादरम्यान क्रिकेट सामन्याची माहिती देत होता. अटक आरोपींपैकी एक आरोपी मूळ गोवा येथील असून, त्याने पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारले आहे. हा आरोपी फोनवरून इंग्लंड येथील एका क्रमांकावर क्रिकेट सामन्याची लाइव्ह माहिती देत असल्याचे निष्पन्न झाले आहे.