Pune Airport: अखेर आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु; 'या' दिवशी होणार पहिले उड्डाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 11:52 AM2022-01-06T11:52:35+5:302022-01-06T11:52:43+5:30
लोहगाव विमानतळावरून जवळपास २२ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु होत आहे
प्रसाद कानडे
पुणे : लोहगाव विमानतळावरून जवळपास २२ महिन्यांनंतर शुक्रवारपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु होत आहे. एयर बबल अंतर्गत ही सेवा सुरु करण्यात येत असून, शारजाहसाठी पहिले विमान झेपावणार आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत असताना ही सेवा सुरु झाली आहे. त्यामुळे याला प्रवाशांचा प्रतिसाद कसा असणार, हे पाहावे लागणार आहे.
पुणे विमानतळाला आखातातील शारजाहसाठी ‘स्लॉट’देखील उपलब्ध होऊन त्याची तारीख व वेळसुद्धा प्राप्त झाली असल्याने या सेवेवर शिक्कामोर्तब झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास पुण्याहून शारजाहसाठी विमानाचे उड्डाण होणार आहे. विशेष म्हणजे पुण्याहून पहिल्यांदाच एअर बबल करारांतर्गत ही विमानसेवा सुरू होत आहे. डिसेंबरपासून प्रशासनाने वेगवेगळ्या स्तरांवर प्रस्ताव पाठवून त्याच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले जात होते. त्याला आता परवानगी मिळाली आहे. मागील पावणेदोन वर्ष पुण्यातील आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद आहेत. त्यामुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘डोमेस्टिक’चे रूप प्राप्त झाले आहे.
पुणे - दुबई विमानसेवा डिसेंबर महिन्यात सुरू होणार होती. मात्र, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर निर्बंध लावल्याने या सेवेसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. मात्र, तत्पूर्वी ‘एअर बबल’अंतर्गत पुण्याहून आंतरराष्ट्रीय सेवेचे जोरदार प्रयत्न झाले.
‘एअर बबल’ करार म्हणजे काय?
कोरोना कालावधीत ज्यावेळी अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर बंदी आणली, त्यावेळी भारतासह काही देशांनी ‘एअर बबल’ करार केला. कोरोना महामारीच्या काळातही विमानसेवा चालू ठेवण्यास आपली हरकत नसल्याचे दोन्ही देश काही अटींसह मान्य करतात. त्यास ‘एअर बबल’ करार म्हटले जाते.
''पुणे - शारजाह विमानसेवेसाठी एअर बबल करार केला आहे. त्या अंतर्गत शुक्रवारी पुण्यातून शारजाहसाठी पहिले उड्डाण होणार आहे. पुण्यात पहिल्यांदाच एअर बबल कराराचा वापर केला आहे. याचा प्रवाशांना लाभ होईल असे लोहगाव (पुणे) विमानतळाचे संचालक संतोष डोके यांनी सांगितले.''