लोणावळ्यात आंतरराष्ट्रीय चित्तथरारक स्लॅकलाईन कसरती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 02:45 PM2020-01-17T14:45:33+5:302020-01-17T14:52:47+5:30
स्लॅकलाईन या साहसी क्रिडा प्रकार म्हणजे दोरवरुन चालणे...
लोणावळा : येथील शिवदुर्ग मित्र, लोणावळा व स्लॅकलाईन इंडिया असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा येथे देशाविदेशातील स्लॅकलायनर, हायलाईनर एकत्र करुन त्यांच्यासाठी गॅदरिंग तसेच ट्रेनिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
स्लॅकलाईन या साहसी क्रिडा प्रकार म्हणजे दोरवरुन चालणे. हा प्रकार भारतात प्रचलित होत चालला आहे. याचाच पुढील प्रकार म्हणजे दोन उंच डोंगरावर दोरी बांधून त्यावर बॅलन्स करत चालणे. याला हायलाईन म्हणतात. हायलाईन या प्रकारात भारतात प्रथम हायलाईन करण्याचा मान शिवदुर्गचे संचालक रोहीत वर्तक यानी मिळवला आहे. रोहीतने हा क्रिडा प्रकार वाढवण्यासाठी अनेक खेळाडू तयार केले आहे.
लोणावळ्यातील ड्युक्स नोज (नागफणी) पायथा, कुरवंडे याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात स्लॅकलायनर, हायलाईनर याची काही प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय कितीर्चे १० खेळाडू व भारतातील अनेक खेळाडू यात सहभागी झाले आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी या पुर्वी सुमारे एक किलोमिटर लाईनवर चालुन विश्वविक्रम केलेले आहेत. यावेळी लोणावळ्यात सुमारे १.३ किलोमीटर लाईन लावून ते खेळाडू स्वत:चे विक्रम तोडतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. १८ जानेवारी पर्यंत हे गॅदरिंग सुरू राहणार आहे.
शिवदुर्ग मित्र, लोणावळा ट्रेकिंग अॅडव्हेंचर क्लब हा ट्रेकिंग, क्लायंबिंग, रेस्क्यू, ऍनिमल रेस्क्यू, सांस्कृतिक, फिटनेस, सायकलिंग, कब्बडी या विविध क्षेत्रात कार्यरत आहे. सोबतच साहस क्रिडा प्रकाराचे शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षणाचे धडे संस्थेमार्फत दिले जातात. स्लॅकलायनर, हायलाईनर या खेळात कोणत्याही प्रकारचे धोके नाही, सुरक्षेचे सर्व उपाययोजना करुन हा खेळ खेळला जाईल. तरी नागरिकांनी उपस्थित राहून या खेळाची माहिती जाणून घ्यावी असे आवाहन शिवदुर्ग च्या वतीनं करण्यात आले आहे.