बांबूंच्या वस्तूंना आंतरराष्ट्रीय मार्केट उपलब्ध व्हावे : राज्यपाल सी. विद्यासागर राव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 07:08 PM2018-10-05T19:08:47+5:302018-10-05T19:15:38+5:30
बांबूच्या वस्तूंच्या विक्रीची क्षमता प्रचंड आहे. स्वयंपाकघरात वापरावयाच्या वस्तू, घरांसाठी उपयोग असे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे बांबूचे उपयोग आहेत.
पुणे : राज्यातील सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठ येथे स्थापन केलेल्या बांबू हस्तकला व कला केंद्रांच्या माध्यमातून बांबूविषयक संशोधन व्हावे. इथे तयार होणाऱ्या बांबूच्या वस्तूंना आंतरराष्ट्रीय मार्केट उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह संत गाडगेबाबा व महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठातील बांबू हस्तकला व कला केंद्राचे सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, वन विभागाचे सचिव विकास खारगे यावेळी उपस्थित होते.
सी. विद्यासागर राव म्हणाले, बांबूच्या वस्तूंच्या विक्रीची क्षमता प्रचंड आहे. स्वयंपाकघरात वापरावयाच्या वस्तू, घरांसाठी उपयोग असे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे बांबूचे उपयोग आहेत. यामध्ये विद्यापीठांनी संशोधन केले आणि नाविन्यपूर्ण कल्पना लढवल्या तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी उलाढाल करणे शक्य आहे. ई-कॉमर्स साईट्सच्या माध्यमातूनही त्यांची विक्री व्हावी. अशा प्रकारे बांबू संशोधन केंद्रे ही ग्रामीण आणि आदिवासी व्यक्तींच्या विकासाची केंद्रे बनावीत. सध्या घरात फर्निचर करावयाचे असल्यास लोकांचा चीनकडे जाण्याचा ओढा असतो, मात्र बांबूच्या वस्तूंचा चांगला उपयोग करून घेतल्यास चिनी व्यावसायिकांना या वस्तूंसाठी महाराष्ट्रात यावे लागावे अशी परिस्थिती निर्माण करायला हवी.
सुधीर मुनगंठीवार म्हणाले, बांबू ही कल्पवृक्ष असलेली प्रजाती आहे. जन्मापासून मरणापर्यंत माणसाला बांबूची उपयोगी पडतो. राज्य शासनाने प्रयत्नपूर्वक बांबू लागवडीवर भर दिल्यामुळे राज्यात त्याचे क्षेत्र ४ हजार ४६२ स्क्वेअर किमी इतके वाढले आहे. बांबू मधून मोठयाप्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतील.’’
विकास खारगे यांनी सांगितले, पूर्वी बांबू हे लाकूड म्हणून गणले जात होते, त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र राज्य शासनाच्या प्रयत्नांनंतर बांबूचा समावेश आता गवत म्हणून करण्यात आला आहे. त्यामुळे मोठयाप्रमाणात बांबू लागवड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
.............
प्राविण्य मिळविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखावा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून माझ्या अनेक अपेक्षा आहेत. विद्यापीठाच्या सर्वच विभागांनी प्राविण्य (एक्सलन्स) मिळवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा अशी अपेक्षा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी यावेळी व्यक्त केली.
डॉ. करमळकर यांनी प्रास्ताविक केले, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी आभार मानले.