आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:09 AM2021-04-22T04:09:28+5:302021-04-22T04:09:28+5:30
बारामती : येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये नॅनो तंत्रज्ञानाचे धडे देण्यात आले. ...
बारामती : येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये नॅनो तंत्रज्ञानाचे धडे देण्यात आले. महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, विज्ञान मंडळ व मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी इंडिया यांच्या विद्यमाने ‘नॅनो तंत्रज्ञानातील वर्तमान व भविष्यातील संधी’ या विषयावर नुकतेच ऑनलाइन आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व शेंझन इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस, न्यूयॉर्क, अमेरिका येथील तरुण शास्त्रज्ञ डॉ. अजिंक्य नेने यांनी याप्रसंगी उपस्थितांना विशेष मार्गदर्शन केले. नॅनो तंत्रज्ञान व नॅनो जैवतंत्रज्ञान या औषधे व रोग निदान या आघाडीच्या क्षेत्रात अतिसूक्ष्म कणांच्या संश्लेषणासाठी प्रस्थापित पद्धतींचा वापर झुगारून ‘क’ जीवनसत्त्वासारख्या जैव आधारित स्त्रोतांचा मूलभूत संशोधनात वापर करावा. त्यातून पर्यावरणपूरक, जैविक व नवनवीन पद्धतींचा अवलंब करून तंत्रज्ञानाचा विकास, मोठ्या प्रमाणात व्यावसायिकीकरण व व्यापारीकरण त्यासाठी स्वयंचलित पद्धती वृद्धिंगत व्हाव्यात, असा आशावाद डॉ. अजिंक्य नेने यांनी व्यक्त केला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या सुनेत्रा पवार यांच्या प्रयत्नातून विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयामध्ये नॅनो तंत्रज्ञान या विषयाच्या संशोधनासाठी अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यासाठी नुकतेच विद्यापीठाकडून भरीव अनुदान मिळाले आहे. त्यानिमित्त हे आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित केले गेले. विद्यार्थ्यांनी या विषयात आंतरराष्ट्रीय दर्जोचे संशोधन करून संस्थेचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी केले.
उद्घाटन डॉ. अरविंद देशमुख यांनी केले, प्राचार्य डॉ. भरत शिंदे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. संजीव पाटणकर, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, नीलिमा पेंढारकर, नीलिमादेवी, डॉ. संजय कांबळे यांनी परिश्रम घेतले.