इंटरनेटची केबल अतिउच्चदाब वीज वाहक तारेवर पडल्याने लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 05:05 PM2021-03-14T17:05:13+5:302021-03-14T17:06:13+5:30
अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने विझली आग
बिबवेवाडी येथील स्वामी विवेकानंद रस्त्यावरील भारत ज्योती बस थांबा येथे इंटरनेट ची केबल महावितरणच्या अतिउच्च दाब असलेली २२ के वी क्षमतेच्या वीज वाहक तारेवर पडल्यामुळे आग लागली होती. अग्निशमन दलाला याची माहिती कळाल्यावर लगेच आग विझवण्याचे काम दलाने केले आहे.
इंटरनेटची केबल एका मोठ्या झाडाच्या फांदीतून गेल्यामुळे या झाडानेही याठिकाणी पेट घेतला होता. या परिसरात अग्नी वर्षाव सुरू झाल्याचे चित्र दिसून येत होते. या रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या महावितरणच्या वीजवाहक ताराना ही आग लागली होती. नागरिक वेळीच सावध झाल्याने सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. यावेळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. विशाल शिंदे यांनी अग्नी शमन दलाला आग लागल्याची माहिती कळवल्यावे लगेच कोंढवा अग्निशमन दलाच्या केंद्रातून अग्निशमन दलाचे प्रभारी अग्नी शमन अधिकारी अनिल गायकवाड, चालक मंगेश काळे, फायरमन अनिमिष कोंडगेकर, महेश फडतरे, सूरज तारू, देवदूत चालक मनोज गायकवाड तसेच पद्मावती विभागाचे महावितरणचे गणेश सुरवसे, अतुल मगर, प्रवीण शितोळे, प्रमोद पवार, तुकाराम वाल्हेकर, दीपक शिंदे गिरीश वखरे, अमित पांगुळ हे कर्मचारी देखील तात्काळ हजर राहिले. अग्नीशमन दलाची एक गाडी व देवदूतची एक गाडी यांच्या मदतीने आग विझवण्यात आली.
लोखंडी रोप फिरवून निर्माण केले केबलचे जाळे
स्वामी विवेकानंद रस्त्याच्या दोन्ही बाजूस समांतर पणे अति उच्च दाबाच्या महावितरणच्या वीज वाहक तारा गेल्या आहेत. तारांवरूनच आडव्या तिडव्या पद्धतीने हे केबल चे जाळे विणले गेले आहे. केबलच्या ताराना उंच इमारती वरून आधार देण्याकरिता लोखंडी रोप फिरवला जातो. या लोखंडी रोपला परवानगी नसताना देखील या रोपच्या मदतीने हे केबल चे जाळे निर्माण केले जात आहे. अशातच हे केबेलचे रोप वीजवाहक तारांवर पडल्यामुळे आग लागण्याच्या दुर्घटना घडत आहेत.