‘नेटा’ने मोबाइलचा वापर तरुणाईसाठी धोकादायक, नैराश्याच्या छायेत युवा पिढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 02:56 AM2018-04-07T02:56:40+5:302018-04-07T02:56:40+5:30
कुणाशी काही बोलायचं नाही, कुणाला काही सांगायचं नाही. मोबाइल हाच मित्र झाल्यामुळे बोलणंच संपलेल्या स्थितीत युवा पिढीतला संयम संपत चालला आहे. दिवसभर डोळ्यासमोर मोबाइल असणाऱ्या तरुणाईला भोवताली काय चालले आहे, याचे भानच नाही. त्याच्याशी काही देणे घेणे नाही.
पुणे - कुणाशी काही बोलायचं नाही, कुणाला काही सांगायचं नाही. मोबाइल हाच मित्र झाल्यामुळे बोलणंच संपलेल्या स्थितीत युवा पिढीतला संयम संपत चालला आहे. दिवसभर डोळ्यासमोर मोबाइल असणाऱ्या तरुणाईला भोवताली काय चालले आहे, याचे भानच नाही. त्याच्याशी काही देणे घेणे नाही. सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत सातत्याने गुंग असताना ‘संवाद’ विसरलेल्या यंग बिग्रेडला सध्या नैराश्य या मानसिक व्याधीने त्रस्त केले आहे.
प्रत्येकाला ज्याची त्याची स्पेस मिळायला हवी, या नावाखाली तरुणाई मुक्तपणा हवा तसा अनुभवते. परंतु त्या मुक्तपणाबरोबरच येणाºया समस्यांना कसे सामोरे जावे, याविषयी ते कुणाचे मार्गदर्शन घेत नाही. त्यांना तसे सांगायला गेल्यास आवडत नसल्याची ओरड पालकांची असते. वय वर्षे १५ ते ३० या कालावधीतील युवा पिढीशी संवाद साधायचा झाल्यास मोठी कसरत करावी लागते. त्यांची एकूणच ऐकून घेण्याची मानसिकता कमी झाल्याने काही सांगायचे म्हटले तरी ‘चिडणे’ हा त्यांचा स्वभाव झाल्याचेही पालक सांगतात. कामाचा वाढत जाणारा ताण, तो असह्य झाल्याने व्यसनाचा घेतलेला आधार, व्यसनांच्या आहारी जावून खालावलेले मानसिक आरोग्य यामुळे तरुणाई कमालीच्या नैराश्यात गुंतत चालली आहे. चिंताग्रस्तता, नैराश्य आणि नेट अँडीक्शन यामुळे युवकांच्या सर्जनशील विचारांत अडथळा येत आहेत. शिक्षणानिमित्त खेडेगावातून शहरांत येणा-या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गाव सोडून शहरात आल्यानंतर शहराबद्द्लची नवलाई, नवीन माणसे, ऐकीव माहितीवर विश्वास ठेवून कुतूहल म्हणून अनेक गोष्टी करु पाहण्याच्या भावनेतून तरुण नैराश्यात अडकताना दिसते.
दृष्टीपटलावर सतत असणारा मोबाईल आणि कॉम्प्युटर्स यामुळे मंदावलेली विचारक्षमता, व्हाट्सअँपच्या अतिरेकामुळे जाअवर्स संपल्यानंतर त्याचा तरुणाईवर झालेला परिणाम गंभीर असल्याचे तज्ञ सांगतात. वाचनापासून दुरावलेली तरुणाईला वैचारिक खाद्य पुरविणा-या माध्यमांबाबत तरुणाई फारशी जागृत नसल्याचे दिसून आले आहे. काही अंशी त्यांचा सहभाग आहे. परंतु तो देखील मर्यादित स्वरुपात असल्याचे पाहवयास मिळते. केवळ तरुणाईच नव्हे तर ज्येष्ठांच्या समस्या देखील फार वेगळ्या नाहीत. त्यांना देखील नैराश्याने ग्रासलेले आहे. वास्तविक तरुणांना संवादात फारसा रस न उरल्याने घरातील ज्येष्ठांशी ‘‘अबोला’’ तणाव तयार करतो. याचा परिणाम ज्येष्ठांच्या मानसिकतेवर होतो.
१८ ते २५ वय वर्ष यात दारू, सिगारेट या व्यसनांविषयीचे आकर्षण ‘‘करून पाहणे’’ या भावनेतून त्या व्यसनांच्या आहारी जाण्याचे प्रमाण तरुणाईत जास्त दिसते.
०९%
ज्येष्ठ नागरिकांमध्ये नैराश्याचे प्रमाण दिसून येते.
१५ ते २९
या वयोगटांत
नैराश्य व अस्वस्थता वाढत आहे.
दैनंदिन जीवनमानात व्यस्तता जास्त आल्याने तरुणांमध्ये नैराश्य वाढल्याचे दिसून येते. साधारण १५ ते २९ या वयोगटांत नैराश्य व अस्वस्थता वाढत आहे. आता डी. एस. एम. (डायग्नोस्टिक अँंड स्टॅटिस्टिकल मॅन्युएल) मध्ये नेट अॅडिक्शन यामुळे होणाºया मानसिक विकाराचा समावेश करण्यात आला आहे. कामाचा वाढता व्याप, त्यामुळे होणारी चिडचिड, अतिरिक्त ताण, त्या ताणाचे रागात होणारे रुपांतर यामुळे मानसिक आरोग्याचे संतुलन बिघडते. केवळ तरुणच नव्हे, तर ९ टक्के ज्येष्ठ नागरिकांमध्ये नैराश्याचे प्रमाण दिसून येते. - डॉ. मधुमिता महाले, येरवडा मनोरुग्णालय
काय झाले?
पूर्वीची एकत्र कुटुंबपद्धती होती ती आता संपल्याने एकोप्याची भावना जाऊन एकटेपणा वाढला.
तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर यामुळे गंभीर समस्या
निर्माण झाल्या.
कामाचा वाढता ताण, तो सहन न झाल्याने चिडचिडेपणा वाढणे
वेळेचे व्यवस्थापन करण्यात येणारे अपयश
काय करता येईल?
घरी आनंदी वातावरण कसे राहील याची काळजी घेणे.
घरातील सर्व सदस्यांनी संवादात्मक भूमिका घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाशी बोलल्यास समस्यांवर उत्तरे शोधता येतील.
पालक-पाल्य यांच्यात सुसंवाद हवा. पाल्याच्या शंकांचे निरसन करण्यात पालकांनी पुढाकार घ्यावा.