जिल्हा परिषदेच्या ४१० शाळांमध्येच इंटरनेट सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:09 AM2021-07-09T04:09:32+5:302021-07-09T04:09:32+5:30
पुणे: कोरोनामुळे सध्या केवळ ऑनलाईन शिक्षणावर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, मोबाईल व इंटरनेटचा अभाव आणि सतत खंडित होणारा ...
पुणे: कोरोनामुळे सध्या केवळ ऑनलाईन शिक्षणावर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, मोबाईल व इंटरनेटचा अभाव आणि सतत खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. त्यातही जिल्ह्यातील केवळ ४१० जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना मोबाईलवर अवलंबून राहावे लागत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळांकडून ऑनलाईन वर्गांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. परंतु, ग्रामीण व दुर्गम भागातील शाळामधील काही विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अॅड्रॉईड मोबाईलच नाही. तसेच मोबाईल आहेत तर वीज नाही, अशी परिस्थिती काही भागात आहे. त्यातही जिल्ह्यातील एकूण १ हजार २६२ शाळांपैकी १ हजार ३३ शाळांमध्येच इंटरनेट सुविधा आहे.
सतत मोबाईल समोर बसण्याचा विद्यार्थ्यांना कंटाळा आला आहे. त्यातच ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटीबाबत अडचणी येत आहेत. परिणामी ऑनलाईन शिक्षणाचा फज्जा उडाला असून विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सुधारणा व्हावी आणि आॅफलाईन शाळा सुरू व्हाव्यात, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
----------------------
आमच्या गावात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची अडचण आहे. दुर्गम भागात वीजपुरवठा खंडित झाल्यास अनेक दिवस मोबाईल चार्ज करणेही शक्य होत नाही. शिक्षक ऑनलाईन पध्दतीने शिकवण्याचा प्रयत्न करतात.परंतु,काही वेळा पालक मोबाईल बाहेर घेऊन गेल्यामुळे ऑनलाईन वर्गांना उपस्थित राहता येत नाही.
- सायली सुतार, विद्यार्थी
-------------------
डोंगराळ भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीबाबत अडचण येते. घरात दोन मोबाईल नसल्यामुळे एकाच वेळी बहिणीचा ऑनलाईन वर्ग आल्यास दोघांपैकी एकालाच वर्गाला उपस्थित राहता येते. पावसाळ्यात आठ ते 15 दिवस वीज पुरवठा खंडित होतो.त्यावेळी ऑनलाईन शिक्षण घेणे शक्यच होत नाही.
- ओम सुतार, विद्यार्थी
--------------
जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा : ३, ६४२
इंटरनेट असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा : ४१०
जिल्ह्यातील एकूण खासगी अनुदानित शाळा : १२६२
जिल्ह्यातील इंटरनेट सुविधा असलेल्या शाळा : १०३३
-------
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे मोबाईलच नाही.त्यामुळे ऑनलाईन वर्गांना खूप कमी उपस्थिती असते.विद्यार्थ्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी अडचणी येत असल्याचे पालकांकडून सांगितले जाते.प्रयत्न करून व इच्छा असूनही ग्रामीण व दुर्गम भागातील शिक्षकांना ऑनलाईन पध्दतीने शिक्षण देता येत नाही.
के.एम.धंद्रे, शिक्षक,
--