प्रवेशाच्या दाखल्यासाठी ‘इंटरनेट’ स्पीडचा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 02:46 AM2018-06-15T02:46:50+5:302018-06-15T02:46:50+5:30
दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता भासते. उत्पन्न, जातीचा दाखला, रहिवासी दाखला यामध्ये महत्त्वाचे आहेत. पूर्वी ‘आॅफलाईन’ दाखल्यांची नोंदणी केली जाई.
बारामती - दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता भासते. उत्पन्न, जातीचा दाखला, रहिवासी दाखला यामध्ये महत्त्वाचे आहेत. पूर्वी ‘आॅफलाईन’ दाखल्यांची नोंदणी केली जाई. आता ‘आॅनलाईन’ नोंदणी होत असल्यामुळे दाखल्यांसाठी जोडलेल्या सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग करावे लागत आहे.
विविध प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी दाखलेच सक्तीचे केले आहे. आता दाखल्यांसाठी गर्दी जास्त आहे. तर सरकारच्या इंटरनेटचे स्पीड कमी आहे, त्यामुळे महसूल अधिकारी, कर्मचारी, सेतू केंद्र चालकांसह विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कागदपत्र तत्काळ देण्यासाठी बोगस एजंटकडुन आर्थिक लुट केली जात असल्याचे चित्र आहे.
दहावी, बारावीचे निकाल जून महिन्यात लागतात. त्यानंतर तात्काळ प्रवेश प्रक्रिया सुरू होते. प्रवेशासाठी जातीचे दाखले, उत्पन्नाच्या दाखल्यांबरोबरच रहिवाशी दाखल्यांचे देखील मागणी असते. त्याचबरोबर ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना क्रिमीलेअर, नॉन क्रिमीलेअरच्या दाखल्यांची देखील आवश्यकता असते. निकाल लागल्यापासून बारामतीच्या सेतू केंद्रात दाखल्यांसाठी गर्दी होत आहे. उत्पन्नाचे दाखले सात दिवसात, जातीचे आणि क्रिमीलेअर, नॉन क्रिमीलेअरचे दाखले १४ दिवसांत दिले जातील, असे सेतू केंद्राचे नासिर शेख यांनी सांगितले.
नोंदणी झाल्यानंतर सह्यांसाठी प्रांताधिकारी, तहसीलदारांकडे दाखले जातात. ही सर्व प्रक्रिया आॅनलाईन पार पाडावी लागते. शेवटी सह्या केल्या जातात. त्यामुळे दाखल्यांसाठी इंटरनेटचे स्पीड अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत दाखले न मिळाल्यास प्रवेश मिळणार नाही, अशी भीती असते. त्याचा फायदा काही बेकायदेशीररीत्या वावरत असलेल्या एजंट घेतात.
...जवळपास १० हजार विद्यार्थ्यांनी कागदपत्रे काढली
तहसिलदार हनुमंत पाटील यांनी ‘लोकमत’शी ंबोलताना सांगितले की,यंदाच्या वर्षी शाळांमध्ये मेळावे घेण्यात आले होते.प्रत्येक शाळांच्या मुख्याध्यापकांची मिटींग घेतली.शाळांना पालकांची मीटिंग घेण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले होते.
महा ई-सेवा केंद्रांना शाळेत जाऊन जातीनिहाय आवश्यक कागदपत्रांचे विवरण नोटीस बोर्डवर लावण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले होते.त्याचा फ ायदा घेउन जवळपास १० हजार विद्यार्थ्यांनी कागदपत्रे काढली.तसेच,इतर विद्यार्थ्यांपेक्षा निकाल जाहीर झाला आहे,प्रवेश घ्यायचा आहे,अशा विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे काढण्यासाठी प्रयत्न करावेत.इतर विद्यार्थ्यांनी ऊशीरा कागदपत्रे काढावीत, असे तहसिलदार पाटील म्हणाले.
...त्यामुळे संथ गतीने काम चालते.
दाखले वेळेत मिळत नाहीत, अशीच स्थिती असल्यामुळे विद्यार्थ्यांचीदेखील धावपळ होते. या संदर्भात बारामतीच्या सेतू केंद्राचे व्यवस्थापक नीलेश राजमाने यांनी सांगितले की, आॅनलाईनमुळे सरकारच्या पोर्टलवर जाऊन लॉगिन करावे लागते. राज्यभरातून सर्व सेतू केंद्र त्याचा वापर करीत असल्यामुळे जोडणीला अडथळा येतो. त्यासाठी रात्री ऊशीरापर्यंत बसुन दाखले दिले जात आहेत.तातडीने आवश्यक सह्या आणुन विद्यार्थ्यांंना दाखले दिले जात आहेत.सर्व्हरचा अडथळा आहे.त्यामुळे संथ गतीने काम चालते.
मध्यरात्रीपर्यंत दाखल्यांच्या नोंदणीचे काम...
बारावीचा निकाल लागल्यानंतर दाखल्यांसाठी गर्दी होत आहे. दिवसभर इंटरनेटचे स्पीड कमी मिळत असल्याने अडचणी येतात. त्यामुळे मध्यरात्री पर्यंत दररोज काम केले जात आहे. बारामती, इंदापूर तालुक्यातील जवळपास १३० ते १४० दाखले सेतू केंद्रात जमा होतात. तितकेच प्रमाण दोन्ही तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्रातून सादर होणाºया दाखल्यांचे आहे. सायंकाळ नंतर नेटचे स्पीड वाढते. त्यामुळे काम करणे शक्य होत आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, यासाठी आमची यंत्रणा कार्यान्वित आहे, असे व्यवस्थापक नीलेश राजमाने यांनी सांगितले.