पुणे-नगर रस्ता दळणवळणासाठी व्यत्यय
By Admin | Published: October 14, 2015 03:26 AM2015-10-14T03:26:31+5:302015-10-14T03:26:31+5:30
औद्योगिकीकरण तसेच दळणवळणाची सुव्यवस्था विकासाच्या धमण्या समजल्या जातात. तालुक्यात औद्योगिकीकरणाचे जाळे विणले गेले.
प्रवीण गायकवाड, शिरूर
औद्योगिकीकरण तसेच दळणवळणाची सुव्यवस्था विकासाच्या धमण्या समजल्या जातात. तालुक्यात औद्योगिकीकरणाचे जाळे विणले गेले. मात्र, या वाढत्या औद्योगिकीकरणासाठी दळणवळणाचे साधन असलेला पुणे-नगर रस्ता दळणवळणासाठी व्यत्यय बनू लागला आहे. याचा परिणाम नवीन उद्योग तालुक्यात येण्यास तयार नाहीत, तर आहे ते उद्योग स्थलांतराच्या विचारात असल्याचे चित्र आहे.
२००० साली रांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहतीची सुरुवात करण्यात आली. पंचतारांकित दर्जा असलेल्या या वसाहतीत मोठ्या प्रमाणावर बहुराष्ट्रीय कारखान्यांचे जाळे विखुरले आहे. या वसाहतीमुळे शासनाने दळणवळण सुरळीत होण्याकरिता शिरूर-पुणे या रस्त्याचे चौपदरीकरणाचे कामही केले. हा रस्ता तयार करताना शासनाने अनेक त्रुटी ठेवल्या, असे आता जाणवते. विदर्भ-मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या या रस्त्यावर दिवसागणिक वाढणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेऊन या रस्त्याच्या दोन्ही बाजूस सर्व्हिस रस्ता तयार करणे गरजेचे होते. तसेच या रस्त्यावर असणाऱ्या गावांच्या ठिकाणी उड्डाणपुलाची सुविधा निर्माण करणेही आवश्यक होते. मात्र, केवळ चौपदरीकरणाचे काम करण्यात आले. अनेक ठिकाणी रस्त्याच्या रुंदीचे निकष पाळण्यात आले नाही. २००५ ते २०१४ पर्यंत या रस्त्यावर पेरणे फाटा (२०१० पर्यंत रांजणगाव येथेही) येथे टोलनाका होता. या नाक्यावरील ढिसाळ नियोजनामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागायच्या, हाही एक मोठा अडथळा होता. संध्याकाळी घरीही वेळेवर पोहोचता येत नाही. यामुळे हा अधिकारीवर्ग तसेच इतर कर्मचारीही त्रासलेले आहे. असहाय असल्याप्रमाणे ते हे सर्व सहन करीत आहेत.