सोनसाखळी चोरांची आंतरराज्य टोळी गजाआड
By admin | Published: March 30, 2017 02:55 AM2017-03-30T02:55:22+5:302017-03-30T02:55:59+5:30
गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने शहरामध्ये संघटीत स्वरूपात सोनसाखळी चोऱ्या करणाऱ्या आंतरराज्य
पुणे : गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने शहरामध्ये संघटीत स्वरूपात सोनसाखळी चोऱ्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीला गजाआड केले आहे. या टोळीकडून २२ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून २८ लाख ५६ हजार २८८ रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात यश आल्याची माहिती उपायुक्त पी. आर. पाटील व सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली.
मुक्तार सय्यद नूर इराणी, वसीम शमीम पटेल (दोघेही वय १९), अलीरजा हुसेन इराणी (वय २४), इम्रान फिरोज इराणी (वय २४, सर्व रा. इराणी गल्ली, पठारेवस्ती, लोणी काळभोर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीचे सोने विकत घेणाऱ्या कालिदास सुदाम काळभोर (वय ३८, रा. लोणी काळभोर), विश्वजित गणपती माल (वय ४७, रा. ढोर गल्ली, गणेश पेठ) या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जानेवारीपासून शहरात सोनसाखळी चोऱ्या करीत असल्याची माहिती युनिट तीनच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार, उपलब्ध माहितीवरून मुक्तार, वसीम आणि अलीरजा यांना मार्केट यार्ड येथील गुन्ह्यामध्ये २५ मार्च रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर, २८ मार्च रोजी इम्रानला पकडण्यात आले.
आरोपींनी स्वारगेट, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, सहकारनगर, सिंहगड रस्ता, वारजे माळवाडी, खडकी, वाकड, सांगवी, भोसरी, हडपसर, कोथरूड या भागात सोनसाखळी चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून २२ गुन्ह्यांमधील १८ लाख ७८ हजार ३८८ रुपयांचे सोने हस्तगत करण्यात आले आहे. तर या चोऱ्या करण्यासाठी वापरलेल्या ९ लाख ४५ हजारांच्या सहा दुचाकी व एक मोटार जप्त करण्यात आली आहे. या गाड्या चोरीच्या असून याबाबत हडपसर, समर्थ, वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, तर ८६ हजारांचे ८ मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सीताराम मोरे, सहायक निरीक्षक रवींद्र बाबर, उपनिरीक्षक प्रकाश अवघडे यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)
आरोपी इम्रान याच्याविरुद्ध शहरात सोनसाखळी चोरीचे ५० गुन्हे दाखल असून शहरातील ११ गुन्ह्यांमध्ये तो पोलिसांना हवा होता, तर कर्नाटकात एकूण ३० गुन्हे दाखल असून बेळगावातील माळमारुती पोलीस ठाण्यातील ६ गुन्ह्यात फरारी आहेत.
यातील चार गुन्ह्यांमध्ये त्याच्या साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा लागली आहे, तर मुक्तार याच्याविरुद्ध मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात सहा गुन्हे दाखल असून बंगळुरू येथील २४ गुन्ह्यात हवा आहे. वसीम याच्याविरुद्ध पुणे व लातूरमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत.
१ चोरीसाठी आरोपी स्पोटर््स बाईकची चोरी करत. दोन वेगवेगळे गट करून टेहळणी करीत. महिलांचा ऐवज हिसकावल्यावर पसार होत असत. पळून जात असताना जर कोणी पाठलाग करायचा प्रयत्न केलाच तर त्याला दुसऱ्या गटामधील आरोपी दुचाकी किंवा मोटार आडवी घालून अडथळा आणीत. चोरीचा ऐवज दुसऱ्या गटातील सदस्यांकडे देऊन सर्व जण पळून जात होते. त्यासाठी त्यांनी नंबर प्लेट बदलून एकच मोटार वारंवार वापरल्याचे समोर आले आहे. अशा गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांनाही सोबत घेतले जात असून त्यांच्याकरवी चोऱ्या केल्या जातात.
२ शहरात गेल्या काही दिवसांत सोनसाखळी चोऱ्या वाढल्या होत्या. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आंबिवली, श्रीरामपूर, लोणी काळभोर, परळी, नेरळ असे राज्यभर छापे टाकले. यासोबत मध्य प्रदेशातील सेंधवा येथीही कोंबिंग आॅपरेशन राबवले. त्यामधून या आरोपींवर कारवाई करणे सोपे झाल्याचे उपायुक्त पी. आर. पाटील यांनी सांगितले.