पंपातील पेट्रोल डिझेल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:11 AM2020-12-24T04:11:43+5:302020-12-24T04:11:43+5:30
बारामती : देशातील विविध राज्यात पेट्रोल पंपांतील पेट्रोल आणि डिझेल ‘सायफन’ पद्धतीने चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश ...
बारामती : देशातील विविध राज्यात पेट्रोल पंपांतील पेट्रोल आणि डिझेल ‘सायफन’ पद्धतीने चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील तिघांना अटक केली आहे. या टोळीने विविध गुन्ह्यांत १३ लाख ४० हजार रुपये किमतीचे १७ हजार ७१८ लिटर डिझेल चोरी केले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून एक ट्रक, २ कॅन, मेटल कटर पान्हा, पाइप, मोबाइल असा १६ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. श्रीराम लाला काळे (वय १९), दशरथ भीमा काळे (२१), नाना गोविंद पवार (५६, सर्व रा. तेरखेडा, जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या गुन्ह्यातील आरोपी दशरथ भीमा माने (वय २१) याच्यासह त्याचे साथीदारावर रामदुर्ग, खानापूर, भेल गोल (कर्नाटक), शंखेश्वर, बार्शी, मिरज, तासगाव तसेच सांगली जिल्ह्यात डिझेल चोरीबाबतचे इतर आठ गुन्हे दाखल आहेत.
पुणे जिल्ह्यात पंपावरील पेट्रोल आणि डिझेल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे अशा गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशेष पथक नेमून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी पथक तयार केले होते. या पथकाने इंधन चोरीबाबतच्या गुन्ह्यांची माहिती घेतल्यानंतर ट्रान्सपोर्ट व्यवसायातील टोळी पेट्रोल, डिझेल चोरी करीत असल्याचे स्पष्ट झाले. शिवाय, सर्व संशयित वारंवार ट्रकमधून माल घेऊन पुणे बाजूकडे येत असल्याचेही स्पष्ट झाले होते.
मंगळवारी (दि.२२) विशेष पथकाला संशयित हे तेरखेडा (ता. वाशी, जि. उस्मानाबाद) येथील असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने तेरखेडा (ता. वाशी) येथील फाट्यावरील एका पंपाची टेहळणी करताना ३ जण दिसून आले. त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी पुणे जिल्ह्यातील पंपावरून पेट्रोल, डिझेल चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपीकडून इंदापूर, वालचंदनगर, नातेपुते, अकलुज परिसरातील पेट्रोलपंपावरील इंधन चोरी केल्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत. दरम्यान, लासुर्णे येथील कुणाल पेट्रोल पंपातून काही दिवसांपूर्वी डिझेल चोरी केल्याचे उघड झाले होते. येथील पंपाचे मालक पृथ्वीराज जाचक यांच्या सतकर्तेमुळे इंधन चोरीचा प्रकार उघड झाला.