मुलाखत : समाजातील श्रेष्ठ-कनिष्ठ वृत्तीला साहित्य छेद देऊ शकले नाही : प्रेमानंद गज्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 07:10 PM2018-11-27T19:10:05+5:302018-11-27T19:11:15+5:30
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणा-या गज्वी यांनी लेखणीची संगिनी कधीच म्यान होऊ दिली नाही. त्यांची ही निवड म्हणजे त्यांच्या लेखनाला मिळालेली ख-या अर्थाने पावती आहे. या सन्मानाबददल या ‘किरवंतकारा’शी लोकमत ने साधलेला संवाद.
शोषित, वंचित, पीडित समाजाच्या दडपलेल्या, दबलेल्या आवाजाला वाचा फोडत वास्तववादाचा चेहरा लेखणीद्वारे समाजासमोर आणणा-या प्रेमानंद गज्वी यांच्यासारख्या एका प्रतिभावंत नाटककाराची ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याने जणूकाही शाहिरी जलसा सारखेच वातावरण नाट्यवर्तुळात निर्माण झाले आहे. समाजात घडणा-या राजकीय, सामाजिक पटलावरील घटनांचे अचूक निरीक्षण करत आपल्या साहित्यकृतींमधून त्याचे यथायोग्य मूल्यमापन करताना अनेकदा त्यांच्या लेखनविरोधात संघर्षाची ठिणगीही पेटली. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणा-या गज्वी यांनी लेखणीची संगिनी कधीच म्यान होऊ दिली नाही. त्यांची ही निवड म्हणजे त्यांच्या लेखनाला मिळालेली ख-या अर्थाने पावती आहे. या सन्मानाबददल या ‘किरवंतकारा’शी साधलेला हा संवाद.
------------------------------------------------------------
नम्रता फडणीस
* नाट्य आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड सन्मानाने आणि बिनविरोध पद्धतीने केली जात आहे, या निवड प्रक्रियेविषयी तुमचं मत काय?
- नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करून हा जो मला सन्मान बहाल केला त्याचा मला आनंद आहे. या निवड प्रक्रियेतही माझ्यासमवेत तीन नावे होती. त्यामुळे मूल्यात्मक चर्चा होण स्वाभाविकच असतं. माझं फार पूर्वीपासून हे मत आहे की आपण लोकशाहीप्रधान देशात राहातो. देशाचा पंतप्रधान देखील लोकशाही पद्धतीने निवडला जातो. मला साहित्यिकांना हा प्रश्न विचारावासा वाटतो की निवडणूक लढवायची नाही पण मला सन्मान हवा. मग हे साहित्यिक लोकशाही मानतात का नाही? जिथे राज्यघटनेनुसार काम चालते. अशा प्रत्येक साहित्य संस्थांच्या स्वत:च्या घटना आहेत. सन्मान दिला तर स्वीकारेन पण निवडणूक लढविणार नाही या साहित्यिकांच्या म्हणण्याचा अर्थबोध होत नाही. निवडणुक लढवणे हा वेगळा अनुभव असतो.
* लेखनाच्या वास्तववादी मांडणीतून तुमची ‘वंचिता’चा लेखक, नाटककार, अशी समाजमनात एक प्रतिमा निर्माण झालेली आहे. याबाबत आपल्याला काय वाटते?
- उपेक्षित वंचित, जातीव्यवस्था याबाबत अभिनिवेश न बाळगता लिहित गेलो. समाजाची जातीयवादी रचना, हिंदुत्वाची मांडणी, राखीव जागांचा मुद्दा निर्माण होताना आपल्या लोकांनाच वंचित ठेवतात का? असा प्रश्न मनात निर्माण होतो. मग त्यातून मला जे सापडत त्याचे मूल्यमापन माझ्या आकलनानुसार करीत जातो. पण वंचिताचा लेखक ही माझी प्रतिमा निर्माण झाली असेल तर ती चुकीची आहे असे वाटते.
* मराठी वाडमयात जी आदिवासी, दलित साहित्य अशी विभागणी झाली आहे, यामुळे ‘दलित नाटककार’, ‘आदिवासी लेखक’ असा एक ठपका साहित्यिकांवर बसल्यामुळे ते साहित्यप्रवाहात समाविष्ट होऊ शकले नाहीत असे वाटते का?
- विशिष्ठ्य ठपके साहित्यिकांवर मारले जाणे हा अज्ञानाचा एक भाग आहे. जातीयव्यवस्थेमध्ये जशी माणसं विखुरली गेली आहेत तशी ती साहित्यामध्येही ती विभागली जावीत अशी भावना असते. काहींच्या हातात श्रेष्ठत्वाची सत्ता असते. प्रत्येकाच्या मनात ‘किरवंत’ दडलेला आहे. दुस-याला तुच्छ लेखण्याची ईर्षा आहे. ती उतरंड आहे तशीच्या तशीच जिवंत आहे उलट वाढली आहे. परवाच कुणीतरी म्हटले आहे की ब्राम्हणाव्यतिरिक्त इतर कुणालाही धर्माबददल बोलण्याचा अधिकार नाही, हे कसले लक्षण आहे? अजूनही साहित्यिक, कलावंत, धर्मपीठाचे अधिकारी यांच्या मनातून आम्ही श्रेष्ठ ही भावना जात नाही. श्रेष्ठ- कनिष्ठाला साहित्याने छेद द्यायला हवा तो अजून दिला गेलेला नाही. हे दुर्दैवाने खरे आहे. समतेची मूल्य अजूनही प्रस्थापित झालेली नाहीत.
* तुमच्या काही कलाकृतीला विरोध झाला. ‘़छावणी’ सारखे नाटक सेन्सॉर बोर्डाने अडवले...अशा माध्यमातून लेखक, नाटककारांचा आवाज दडपला जातोय, एक नाट्यसंमेलनाध्यक्ष म्हणून तुम्ही याकडे कसे पाहाता?
- लेखकाने खंबीरपणे लिहिले पाहिजे. आपली भूमिका ठामपणे मांडत राहिले पाहिजे. ‘छावणी’ ला लोकांनी विरोध केला. सेन्सॉरने ते नाटक अडवले. त्यांच्याशी भांडून त्यांना नाटक समजावले. ते तर इतके म्हटले की तुम्ही राज्यघटनेच्या विरोधात लिहित आहात. पण मी घटना किंवा भारताविरूद्ध बंड करीत नाही. उलट जी काही समाजरचना आहे त्यातील दूषित विचारांपासून वाचविण्यासाठी ही ‘छावणी’ आहे. त्यांना वाचूनही आकलन झाले नसेल तर तो दोष लेखकांचा नाही.
* ‘छावणी’ नाटकाला अजूनही निर्माता मिळू शकलेला नाही, मग हे रंगभूमीचे अपयश आहे असे वाटते का?
- हे रंगभूमीचे अपयश आहे असे मानत नाही. निर्माता विचार करतो की नाटक केले तर पैसे परत मिळतील का नाही? त्यांच्यात एक भय असते. याबरोबरच आतून सुरूंग लावून हे नाटक रंगमंचावर येऊ नये अशीही व्यूहरचना केली जाते असे वाटते. पण निखळपणे कला म्हणून अशा कलाकृतींकडे पाहायला हवे. शासनानेही यात लक्ष घालण्याची गरज आहे. प्रायोगिक रंगभूमीचे कलाकार स्वत:च्या खिशातून पैसे काढून नाटक करतात त्यांना शासनाने अनुदान द्यायला हवे. देशातील कला समृद्ध झाली पाहिजे. ही कलाकृती रंगमंचावर आली नाही तरी नाटकाचे पुस्तक प्रकाशित करण्याचा विचार आहे. महिन्यअखेर हे पुस्तक येईल. हा विषय काही करून लोकांसमोर पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.
* राष्ट्रपुरूषांना अनेकदा देव्हा-याच्या चौकटीत बसवले जाते मात्र त्यांच्या मूळ विचारांपासून फारकत घेतलेली दिसते. त्यांच्या नावाने जे राजकारण होत आहे त्याविषयी तुमचं मत काय?
- लोकांच्या मनात आजही विभूती पूजेची भावना आहे. जी राज्यकतर््यांनी वाढवली आहे. समुद्रात पुतळे बांधणे म्हणजे पर्यटनाला चालना देणे, इथे अर्थव्यवस्थेचा भाग येतो. देशाचा कारभार भांडवलदारच चालवत असतात.
* अनेक विषयांवर लेखक, साहित्यिक भूमिका घेताना दिसत नाहीत, असे सातत्याने म्हटले जाते, यात कितपत तथ्य जाणवते?
- साहित्यिक भूमिका घेत नाहीत हे म्हणणे योग्य ठरणार नाही. भूमिका घेण्याच्या त्यांच्या पद्धती आहेत. कोण माणूस पुढे येईल आणि लेखकाच्या कानाखाली वाजवेल सांगता येत नाही. प्रत्येकाला एक जगण्याचे भय असते. पण जिथे सुसहय असेल तिथे साहित्यिक त्याची भूमिका मांडत असतो. तो लेखनातून निषेध नोंदवितच असतो. हातात दांडका घेऊन बसले आणि तुम्ही लिहिले तर तुम्हाला मारू तर कसे होणार? असे का नाही म्हणत की आम्ही तुमची बाजू समजून घेऊ.
* रंगभूमीबदलचे चित्र कसे जाणवते सकारात्मक की नकारात्मक?
- राज्य नाट्य स्पर्धेत खूप चांगले विषय हाताळले जात आहेत, चित्रपट आणि मालिकांमधून वेळ काढून कलाकार नाटके करीत आहेत, हे नक्कीच चांगले चित्र आहे. पण नाटके मुंबई-पुण्यापुरतीच मर्यादित राहिली आहेत. ती खेड्यापेड्यात पोहोचलेली नाहीत. नाटकाचे तिकिट ८००रूपयांपर्यंत गेले आहे, मग ही समृद्धता मानायची का? त्यामुळे रंगभूमीकडे पाहाण्याचा दृष्टीकोन प्रत्येकाचा वेगळा आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------.