मुलाखत : अभिजाततेच्या ऊंबरठ्यावरच थबकली मराठी : शंकर सारडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 07:00 AM2019-10-06T07:00:00+5:302019-10-06T07:00:09+5:30

पहिला ह. मो. मराठे स्मृतीगौरव पुरस्कार प्रसिद्ध समीक्षक शंकर सारडा यांना जाहीर...

Interview: Marathi stop on the door classical mode : Shankar Sarada | मुलाखत : अभिजाततेच्या ऊंबरठ्यावरच थबकली मराठी : शंकर सारडा 

मुलाखत : अभिजाततेच्या ऊंबरठ्यावरच थबकली मराठी : शंकर सारडा 

Next

- प्रसिद्ध लेखक ह. मो. मराठे यांच्या स्मृतीनिमित्त देण्यात येणारा पहिला ह. मो. मराठे स्मृतीगौरव पुरस्कार प्रसिद्ध समीक्षक शंकर सारडा यांना जाहीर झाला आहे. रविवारी (दि. ६) सायंकाळी ५ वाजता कोथरूडमथील मयूर कॉलनी येथील ज्ञानमयी सभागृहात या पुरस्काराचे वितरण होत आहे. त्यानिमित्त सारडा यांच्याबरोबर राजू इनामदार यांनी केलेली बातचीत.

-------------
साहित्यसृष्टीत समीक्षकांचा नेहमीच दबदबा राहिला आहे. शंकर सारडा हे त्यातले एक नाव. सारडा यांनी आपल्या पुस्तकावर लिहावे, कुठेतरी काहीतरी बोलावे यासाठी अनेक नवोदित तसेच मान्यताप्राप्त जुन्याही साहित्यिकांची धडपड चाललेली असायची. वृत्तपत्रांच्या साप्ताहिक पुरवण्यांना साहित्याची जोड देण्यात सारडा यांचे योगदान फार मोठे आहे. त्यापुर्वी वृत्तपत्रांच्या या पुरवण्या म्हणजे विचारी, राजकीय, सामाजिक अशा लेखांनी म्हणजे थोडक्यात रटाळ असायच्या. वृत्तपत्रांच्या साप्ताहिक पुरवणीला वाचनियता, रंजकता दिली ती सारडा यांनी. त्यात लेखक, त्यांची प्रतिभा, पुस्तके, त्यांचे समीक्षण असा मजकूर येऊ लागला व त्यांचे स्वरूपच बदलले.
गेल्या काही वर्षात सारडा प्रकाशाआड गेले आहेत. जाहीर कार्यक्रमांमधून त्यांची उपस्थिती जवळपास नसतेच. लिखाणही कमी झाले आहे. वृद्धत्व व आजारपण यामुळे ते फारसे कोणात मिसळतही नाहीत. अशा वेळी एका साहित्यसंस्थेला त्यांची, त्यांनी केलेल्या कामाची आठवण व्हावी, ही साहित्यप्रेमींसाठी आनंदाची गोष्ट. यानिमित्ताने त्यांच्याशी बोलताना वयाच्या ८२ व्या वर्षीही त्यांच्या साहित्यिक जाणीवा अद्यापही तल्लख असल्याचे जाणवले. 

परदेशी लेखकांच्या तुलनेत मराठी लेखक कुठे दिसतात तुम्हाला?
--  परदेशी लेखकांचे अनूभवविश्व अमर्यादीत असते व ते लेखनात प्रतिबिंबीत होते हा मला जाणवणारा फरक आहे. ज्यूल्स व्हर्न नावाचे एक लेखक होता. त्याने बलूनमधून पृथ्वी प्रदक्षिणा करण्याचा प्रयत्न केला. पाणबुडीतून समुद्राखालचे जग शोधण्यासाठी तो समुद्रात उतरला. त्यानंतर पृथ्वीचा मध्यभाग शोधायचे वेड त्याला जडले व तेही त्याने केले. या सगळ्या अनुभवांवर त्याने पुस्तके लिहिली. ती गाजली. मला सांगा आपल्याकडे असे कोणी करेल का? मानवी जीवनातील भावभावना टिपणे हे चांगलेच असते, पण त्यालाही आपल्याकडे मर्यादा आहे. काही विशिष्ट संबधांच्या पलिकडे कोणी जातानाच दिसत नाही. फिरले पाहिजे, माणसे वाचली पाहिजेत, जग पाहिले पाहिजे  ते लेखनातून आणण्याचा प्रयत्नही केला पाहिजे.

असे आपल्याकडे कोणी केलेले आठवते का?
- अंदाजाने सांगायचे म्हटले तरी मी आतापर्यंत किमान ४ हजार पुस्तके वाचली. त्यातल्या किमान ३ हजार तरी पुस्तकांवर मी थोडेफार लिहिले. त्यात अर्थातच इंग्रजी वगैरे पुस्तके आहेत, मात्र मला मराठीत हाताच्या बोटावर सांगता येतील इतकीच पुस्तके लक्षात ठेवावीत अशी आढळली. झाडाझडती (विश्वास पाटील), बालकांड (ह. मो. मराठे), वाईज अदरवाईज (सुधा मुर्ती) ही व अशी आणखी काही सांगता येतील. अर्थातच हे माझे वैयक्तिक मत म्हणून घ्या, पण डोके बधीर करील, मन सुन्न करील असे काही नाही.
इतकी वाईट अवस्था आहे?
-  मी असे म्हटलेले नाही. मराठीतही अनेक चांगले लेखक आहेत.

कोणते लेखक तुम्हाला असे आवडले? 
-  ‘हिंदू.’  ही मला अलीकडच्या काळात भावलेली कांदबरी आहे. तिचा दुसरा खंडही येतोय म्हणे. रंगनाथ पठारे यांचीही एक कांदबरी (इथे मी तिचे सातपाटील कुलवृत्तांत हे नाव सांगितले, पण त्यांचे लक्ष नव्हते) आली आहे असे कळले.अलीकडे माझे वाचन होत नाही फार, पण विजय तेंडूलकरांसारखे लेखक माझ्या लक्षात आहेत. पठारे यांचेही मी बरेच वाचले आहे. मला असे म्हणावेसे वाटते आहे की अभिजाततेच्या उंबरठ्यावरच मराठी थबकली आहे. काळाच्या कसोटीवरही टिकेल असे साहित्य निर्माण करण्याच्या उंबरठ्यापर्यंत मराठीत अनेकजण पोहचले, काहींनी आत पाऊलही टाकले पण आत प्रवेश केला आहे असे प्रकर्षाने वाटले नाही.

आताच्या मराठी साहित्याबद्दल तुमचे मत काय?
-  अलीकडे माझे वाचन जवळपास होतच नाही. मनन मात्र चाललेले असते. मराठीतील साहित्य इतर भाषांमध्ये पोहचायला हवे, याबाबत मी कायमच आग्रही होते. तशा दर्जाचे साहित्य मराठीत आहे. आपण इतर भाषांमधले साहित्य मराठीत आणतो पण मराठीतील इतर भाषांमध्ये नेण्यासाठी प्रयत्न करत नाही. तसा तो झाला पाहिजे. 

Web Title: Interview: Marathi stop on the door classical mode : Shankar Sarada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.