सर्व प्रकारच्या संगीताचे ज्ञान असणे आवश्यक : प्यारेलाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 06:42 PM2019-01-28T18:42:22+5:302019-01-28T19:10:58+5:30
भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या नावाची सर्वाधिक यशस्वी संगीतकार म्हणून नोंद झाली आहे. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता प्यारेलाल शर्मा यांच्याशी लोकमत ने साधलेला हा संवाद.
1963 मध्ये पारसमणी चित्रपटापासून सुरू झालेला त्यांचा सांगितिक प्रवास 1998 पर्यंत अविरतपणे चालू होता. या पस्तीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 650 चित्रपटांना संगीत देऊन संगीतविश्वात स्वत:चे अढळपद निर्माण केले.भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या नावाची सर्वाधिक यशस्वी संगीतकार म्हणून नोंद झाली आहे. लक्ष्मीकांत कुडाळकर यांच्या निधनानंतर प्यारेलाल यांनी चित्रपटांना संगीत देणे काहीसे कमी केले. मात्र या द्वयींनी संगीतबद्ध केलेली एकसे बढकर एक गाणी आजही रसिकांच्या हदयावर अधिराज्य गाजवत आहेत. हेच या संगीतकार जोडीचे यश आहे.
- नम्रता फडणीस-
* भारतीय चित्रपट संगीतात लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडीने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. या सांगीतिक वाटचालीची सुरूवात कशी झाली?
- संगीत ही अशी गोष्ट आहे जी आयुष्यभर शिकत राहिले तरी ती संपणार नाही. वडील पं. रामप्रसाद शर्मा (बाबाजी) संगीताचे जाणकार होते. ते ट्रम्पेटवादक म्हणून ओळखले जायचे. 1940-50 मध्ये चित्रपट संगीतात शास्त्रीय संगीताचा अधिक वापर केला जात होता. मात्र वडिलांनी पाश्चात्य संगीताचेही ज्ञान आत्मसात केले. बाबाजी पाश्चात्य पद्धतीची नोटेशन करायचे. वडिलांनी मला नोटेशन करायला केवळ अर्ध्या तासात शिकविले. नोटेशन लेखनाचा सराव करून ते तंत्र आत्मसात केले. त्यानंतर वडिलांनी हातात व्हायोलिन दिले आणि त्यांच्याकडूनच व्हायोलिनवादनाचे धडे मिळाले. आजही व्हायोलिन हातातून सुटलेले नाही.
* लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांच्याशी भेट कधी झाली? आणि तुमच्यात टयुनिंग कसं निर्माण झालं?
* 1952-53 मध्ये लक्ष्मीकांत यांच्याशी ओळख झाली. त्यावेळी मी केवळ 12-13 वर्षांचा होतो. त्यावेळी आम्ही संगीतकार म्हणून काम करीत होतो. 1958 मध्ये आम्हाला खय्याम, कल्याण-आनंदजी यांच्याकडे सहाय्यक आणि संयोजन करण्याची संधी मिळाली. आम्ही एकत्र काम करीत होतो तरी आमच्यात तू आणि मी असे नव्हते तर हम हीच भावना होती. कधीही अहंकार आडवा आला नाही. आम्ही शंकर-जयकिशन यांना खूप मानायचो. जिथे मी आणि तू आले तिथे काम होऊच शकत नाही. आम्ही एकमेकांवर कधी अवलंबून राहिलो नाही. दोघेही चाली बनवायचो, ज्याची आवडली ती घेतली जायची पण मनात एकमेकांबददल कधीही किंतु ठेवला नाही.
* शब्द सुरांच्या मिलाफामध्ये कोणता सांगीतिक विचार होता?
- संगीतात रागदरबारीला पकडून ठेवत गाणे तयार करायचे झाले तर दोन तास रसिक ते ऐकतील याची खात्री देता येत नाही. त्यावेळी मग ते उपशास्त्रीय अंगाने करावे लागते. काही गोष्टी सोडाव्या लागतात. यासाठी सर्वप्रकारच्या संगीताचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
* आजही जुन्या काळातील गाणी रसिकांच्या मनात रूंजी घालतात, तशी गाणी सध्या निर्माण होत नाहीत अशी टीका केली जाते? त्याबददल काय वाटते?
- तसे काही नसते. काळ बदलत असतो. आम्ही जेव्हा सुरूवात केली तेव्हा पण संगीताचा काळ वेगळाच होता. पण हेही तितकेच खरे आहे की गाण्यातील मेलडी, त्यावेळचा जिव्हाळा आज पाहायला मिळत नाही. फरक फक्त इतकाच आहे की आताच्या काळातले संगीतकार काही पकडून ठेवत नाही. जे काम करतात त्यात कल देखेंगे दुसरे होईल. पण आम्ही आजचा विचार करायचो. थोडक्यात दिल तेरा दिवाना, दिल मचल गया तो मेरा क्या कसूर किंवा दिल ही तो है असे म्हटले जायचे. मात्र आज दिल बत्तमीज हो गया है. शब्द, विचार अंदाज बदलला आहे.
* हिंदी आणि मराठी चित्रपट गीतांमध्ये इंग्रजी, पंजाबी शब्दांचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला झाल्यामुळे संगीताची गोडी हरवून बसलोय असे वाटते का?
- त्यावेळी संगीत क्षेत्रात संयोजक, वादक असायचे ते ख्रिश्चन पारसी असायचे. त्यामुळे इतर भाषेतील शब्दांमुळे संगीताची गोडी हरवत चालली आहे असे म्हणता येणार नाही. पाश्चात्य संगीत हे परिपूर्ण आहे तर भारतीय संगीत हे ग्रँड आहे. ओम च्या शिवाय सा लावूच शकत नाही.
* संगीतावर तंत्रज्ञान हावी होत आहे असे वाटतय का?
-काही जण संगीतामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत, त्यांना तंत्रज्ञानाची माहिती आहे. पण त्याला कुठल्या दिशेला घेऊन जायचय तेच त्यांना अनेकदा उमगत नाही. आम्ही देखील साईबाबा चित्रपटात तंत्रज्ञानाचा वापर केलाय. मात्र, त्याबरोबरीने 20 जणांचे कोरस गायनही केले आहे. पाच इकडे, दहा तिकडे अशा माध्यमातून त्याचा उपयोग केला आहे. तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने आणि हवा तिथेच वापर व्हायला पाहिजे.
---------------------------------------------------------