बाहेरच्या झगमगटापेक्षा अंतरंगातील शांतता जास्त भावते : कौशिकी चक्रवर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:02 PM2017-12-13T13:02:21+5:302017-12-13T13:12:21+5:30
बाहेरच्या झगमगटापेक्षा अंतरंगातील शांतता जास्त भावते, अशा शब्दांत प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी सांगीतिक प्रवास उलगडला.
पुणे : मुखडा आणि मुखवटा यात खूप फरक आहे. आसू आणि हसू अशा भावना मुखड्यावर उमटतात, मुखवट्यावर नाही. त्यामुळे बाहेरच्या झगमगटापेक्षा अंतरंगातील शांतता जास्त भावते, अशा शब्दांत प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी सांगीतिक प्रवास उलगडला.
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा अंतर्गत संवादात्मक अंतरंगमध्ये प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांची मुलाखत रंगली. गायन क्षेत्रातील त्यांचा प्रवास श्रीनिवास जोशी यांनी साधलेल्या संवादातून उलगडत गेला. शिवाजीनगर येथील सवाई गंधर्व स्मारकात हा कार्यक्रम पार पडला.
त्या म्हणाल्या, की केवळ तानपुरा घेऊन गायला बसणे, म्हणजे तालीम नव्हे. साधना ही समजून घेऊन अवलंबण्याची, जगण्याची प्रक्रिया असते. एखादी गायकी समजण्यासाठी, जगण्यासाठी ती धारण करणे आवश्यक असते. राग केवळ सादर न करता कलाकाराला त्याचा भाग बनला पाहिजे. राग हा त्याचा चेहरा झाला पाहिजे. गायकी शिकताना पहिली १५-२० वर्षे प्रसिद्धीची दारे बंद करून साधना करावी लागते. स्वतःला पारखून घ्यावे लागते. आजच्या पिढीत हा संयम आहे का, याचा विचार करावा लागेल. त्यावरच संगीताचे भविष्य अवलंबून असेल.