विधानसभा निवडणुकीचे वारे लागले वाहू ; राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 04:38 PM2019-07-25T16:38:59+5:302019-07-25T16:44:01+5:30
पुणे शहरातील आठ विधानसभा मतदार तब्बल ५२ इच्छुकांनी अर्ज केले आहेत...
पुणे : मतदार संघा संदर्भातील चर्चा, मेळावे, इच्छुकांच्या मुलाखती अशा विविध पातळीवर सध्या विविध पक्षांकडून विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे. यामध्ये शहर आणि जिल्ह्यात सर्वच ठिकाणी निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने येत्या शनिवारी (दि.२७) आणि रविवारी (दि.२८) जुलै रोजी पुण्यात मार्केटयार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयामध्ये जिल्ह्यातल्या २१ विधानसभा मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती आयोजित केल्या आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार विद्या चव्हाण यांच्या उपस्थित या मुलाखती घेण्यात येणार आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले की, येत्या शनिवारी जिल्ह्यातील भोर, मावळ, शिरुर-हवेली, खेड-आळंदी, जुन्नर, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या दहा विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. सकाळी ९.३० वाजता भोर विधानसभा मतदार संघापासून मुलाखती सुरु होऊन दुपारी ३ वाजता पुरंदर विधानसभा मतदार संघातील मुलाखतीने समारोप करण्यात येणार आहेत.
त्यानंतर रविवार (दि.२८) रोजी पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड येथील ११ विधानसभा मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याचे पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी सांगितली. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदार तब्बल ५२ इच्छुकांनी अर्ज केले आहेत. यामध्ये सर्वांधिक इच्छुक हडपसर आणि खडकवासला मतदार संघात आहेत. यामुळे येथे उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच होणार असून, मुलाखती दरम्यान प्रत्येकजण मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.