भाजपाकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू
By admin | Published: January 9, 2017 03:42 AM2017-01-09T03:42:49+5:302017-01-09T03:43:38+5:30
आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास रविवारपासून सुरुवात करण्यात आली.
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास रविवारपासून सुरुवात करण्यात आली. पक्षाकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार उमेदवारांनी कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता, मुलाखतीला सामोरे गेले. सर्व उमेदवारांच्या अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ‘वन टू वन’ मुलाखती घेण्यात आल्या. या वेळी उमेदवारांसमवेत एकाही कार्यकर्त्याला आतमध्ये प्रवेश देण्यात आला नाही.
भाजपाकडून पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक १ ते १०मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. प्रभाग १ ते १०चा बहुतांश भाग हा वडगाव शेरी व औंध, पाषाण, बालेवाडी येथील होता. त्याला इच्छुकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळी ९ वाजल्यापासून मुलाखतींना प्रारंभ झाला. पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, विजय काळे, मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर, सरचिटणीस मुरली मोहोळ, उज्ज्वल केसकर, दीपक मिसाळ, गणेश घोष, महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकला मेंगडे, युवा मोर्चा अध्यक्ष दीपक पोटे, अनुसूचित जाती मोर्चाचे समन्वयक डॉ. भरत वैरागे यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
सुरुवातील उमेदवारांकडून त्यांच्या कामाची माहिती दिली जायची. त्यानंतर निवड समितीमधील सदस्यांकडून उमेदवारांना प्रश्न विचारले जायचे. त्यामध्ये तुम्ही मागची निवडणूक लढविली होती का, किती मते पडली होती, तुमच्या पॅनलमध्ये इतर कोणते सदस्य असावेत आदी विचारणा केली जात होती.
काही उमेदवार मोठ्या आत्मविश्वासाने मुलाखतीला सामोरे जात होते, तर काहीजणांना मुलाखत देताना घाबरल्यासारखे झाले. प्रत्येक इच्छुक उमेदवाराला ‘वन टू वन’ पॅनलसमोर बोलावून त्याचे म्हणणे ऐकून घेण्यात आले, त्यामुळे सकाळी सुरू झालेल्या मुलाखती रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्या. सोमवारी प्रभाग क्रमांक ११ ते २०, मंगळवारी २१ ते ३० आणि बुधवारी ३१ ते ४१ प्रभागांच्या मुलाखती होणार आहेत. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत पहिल्या पाच प्रभागांच्या आणि दुपारी ३ ते रात्री ८ उर्वरित पाच प्रभागांच्या मुलाखती होणार आहेत. पक्षाकडून एकूण १०९२ इच्छुकांनी अर्ज नेले होते. त्यापैकी ८७० जणांनी अर्ज भरून पक्षाकडे दिले आहेत. पुरुष इच्छुकांची संख्या ४९० आणि महिला इच्छुकांची संख्या ३८० इतकी आहे.