खासगी क्लासमध्ये प्रवेशाचीही धाकधूक
By Admin | Published: May 10, 2017 04:26 AM2017-05-10T04:26:00+5:302017-05-10T04:26:00+5:30
इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेण्याआधी विद्यार्थी व पालकांना खासगी कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेण्यासाठी झगडावे लागत असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेण्याआधी विद्यार्थी व पालकांना खासगी कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेण्यासाठी झगडावे लागत असल्याचे चित्र आहे. क्लासमध्ये प्रवेशासाठीही ‘मेरिट’ गरजेचे असल्याने त्यांची चिंता वाढली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेत हमखास यश
मिळवून देण्याचे आमिष या क्लासकडून दाखविले जात असल्याने पालकही त्याला भुलू लागले आहेत. परिणामी, विद्यार्थी व पालकांना अकरावी प्रवेशापेक्षा क्लासमधील प्रवेशाची अधिक काळजी असल्याचे दिसते.
काही वर्षांपासून खासगी क्लासचे पेव फुटले आहे. इयत्ता पहिलीपासून पीएच.डी.ची तयारी करण्यापर्यंत विविध पद्धतीने खासगी क्लास आणि मार्गदर्शन वर्ग सुरू झाले आहेत. त्यातही पूर्वी दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या क्लासची संख्या मोठी होती. त्यानंतर अभियांत्रिकी व वैद्यकीय अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी राज्य शासनाने समाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) सुरू केली. मग क्लासमध्ये ‘सीईटी’ तयारीच्याही जाहिराती सुरू झाल्या.अकरावी व बारावीतील विज्ञान विषयांबरोबरच ‘सीईटी’ची तयारी करून घेण्याचे आमिष दाखविण्यात आले. सीईटी झाल्यानंतर क्लासमधील यशस्वी विद्यार्थ्यांची जाहिरातबाजी सुरू झाली. त्यामुळे विद्यार्थी व पालकही मोठ्या प्रमाणात या क्लासकडे वळू लागले. आता तर अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांसाठी राज्य सीईटी तसेच केंद्रीय पातळीवर जेईई आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी ‘नीट’ या प्रवेश परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यानुसार क्लासचीही भर पडली असून, सध्या शहरभर ठिकठिकाणी असे क्लास सुरू झाले आहेत.
महाविद्यालयांमध्ये केवळ अकरावी व बारावीचा अभ्यासक्रम शिकविला जातो. तर, जेईई किंवा नीट परीक्षेसाठी थोडा कठीण अभ्यासक्रम असल्याचा गवगवा करीत अनेक खासगी क्लास विद्यार्थी व पालकांना आकर्षित करीत आहे. त्यामुळे अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी सर्रास या क्लासमध्ये जाण्यासाठी उत्सुक दिसतात. विद्यार्थी-पालकांचा ओढा वाढू लागल्याने क्लासनी प्रवेशासाठी परीक्षा घेण्यास सुरुवात केली
आहे. तसेच, काही क्लासकडून दहावीतील गुणांच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे.
यामुळे अकरावी प्रवेशापूर्वीच विद्यार्थी-पालकांना क्लासमध्ये प्रवेशाची चिंता लागली आहे. अकरावीचे प्रत्यक्ष प्रवेश दहावीच्या निकालानंतर काही दिवसांनी सुरू होतात; पण क्लासमध्ये प्रवेशासाठी मात्र आत्तापासूनच गर्दी वाढू लागली आहे. यामध्ये काही महाविद्यालयांनी क्लासशी करार करून वर्गातील उपस्थितीत सवलत देण्याचा चुकीचा पायंडा पाडण्यास सुरुवात केल्याने क्लासचे अधिकच फावले आहे.