अवैध १२ अर्ज ठरविले वैध; अर्ज माघारीनंतर एकूण ४ प्राचार्य बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 04:13 AM2018-01-09T04:13:40+5:302018-01-09T04:13:53+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या निवडणुकांमध्ये विद्यापीठाच्या निवडणूक विभागाने अगदी किरकोळ कारणे काढून बाद ठरवलेले १२ निवडणूक अर्ज कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी हस्तक्षेप करून वैध ठरविले आहेत.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या निवडणुकांमध्ये विद्यापीठाच्या निवडणूक विभागाने अगदी
किरकोळ कारणे काढून बाद ठरवलेले १२ निवडणूक अर्ज कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी हस्तक्षेप करून वैध ठरविले आहेत. अधिसभेच्या पदवीधर प्रतिनिधी व व्यवस्थापन प्रतिनिधी पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये बाद ठरविलेले ९ उमेदवारी अर्ज कुलगुरूंनी वैध ठरविले होते. त्यामुळे मागचीच पुनरावृत्ती पुन्हा झाली आहे.
विद्यापीठाच्या अधिसभेवर प्राचार्य गटातून १० सदस्य, अध्यापक गटातून १० सदस्य, विद्यापीठ अध्यापकातून ३ सदस्य, विद्या परिषदेवर ८ सदस्य व प्रत्येक अभ्यास मंडळावर ३ विभागप्रमुख निवडून द्यावयाचे आहेत. यासाठी
अर्ज माघारी घेण्यासाठी सोमवारची अखेरची मुदत होती. अर्ज
माघारीनंतर महिला गटातून स्नेहल अग्निहोत्री या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
छाननीमध्ये यापूर्वीच अधिसभेवर प्राचार्य गटातून नाशिक जिल्ह्यातील हरसूल येथील महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य मोतीराम देशमुख, इंदापूर येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे आणि भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे डॉ. बाबा सांगळे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे एकूण ४ प्राचार्यांची अधिसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.
प्राचार्यांच्या खुल्या गटातील ५ जागा व अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अधिसभेची निवडणूक होणार आहे. अध्यापक गटातून दहाही जागांसाठी निवडणूक होणार आहे.
विद्या परिषदेच्या ८ जागांसाठी निवडणूक होईल. अधिकार मंडळांसाठी येत्या २१ जानेवारी
रोजी यासाठी निवडणूक होणार
असून, मतमोजणी २३ जानेवारी
रोजी आहे.
११ हजार मतदार बजावणार हक्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळांच्या निवडणुकीमध्ये प्राचार्य गटातून ३०९ मतदार, अध्यापक गटातून १० हजार ५०० मतदार, तर विद्या परिषद गटातून १० हजार ८०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
प्राचार्य महासंघाला विकास मंचचा पाठिंबा
अधिसभा निवडणुकीमध्ये प्राचार्य गटातून निवडणुकीला उभ्या राहिलेल्या प्राचार्य महासंघाच्या उमेदवारांना विद्यापीठ विकास मंचकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
तर प्राध्यापक गटातून सावित्रीबाई
फुले विद्यापीठ शिक्षक संघ या संघटनेच्या उमेदवारांना मंचने पाठिंबा दिला आहे, अशी माहिती विकास मंचचे प्रांताध्यक्ष डॉ. ए. पी. कुलकर्णी
यांनी दिली.
प्राध्यापक गटातून पुटो व पुक्टो या प्राध्यापकांच्या संघटनेने स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले आहेत.