अवैध वाळूउपसा सुरूच
By admin | Published: August 25, 2015 04:36 AM2015-08-25T04:36:39+5:302015-08-25T04:36:39+5:30
गेल्या आठ महिन्यात प्रशासनाने बेकायदा वाळूउपशाविरोधात वारंवार मोहिमा उघडल्या़ उपसा करणाऱ्या बोटी जाळल्या. जेटी, पोकलेन, ट्रक जप्त केले़ त्यांच्यावर
बारामती : गेल्या आठ महिन्यात प्रशासनाने बेकायदा वाळूउपशाविरोधात वारंवार मोहिमा उघडल्या़ उपसा करणाऱ्या बोटी जाळल्या. जेटी, पोकलेन, ट्रक जप्त केले़ त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही केली़ मात्र, पुन्हा त्या-त्या ठिकाणी अवैध वाळूउपसा सुरूच असल्याचे चित्र आहे. कारवाईला आपण भीक घालत नसल्याचे वाळू माफियांनी दाखवून दिले आहे़
एका महिन्यापूर्वी वाळू माफियांनी केवळ वाळूउपसा करण्यासाठी नीरा नदीवरील बंधारा जिलेटिनचा स्फोट घडवून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तर, निंबूत छप्री परिसरातील घुमटवस्ती येथील पूल वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे तुटला. वाळू माफियांमुळे मोठे नुकसान होत आहे. मुरूम, मळशी, वाघळवाडी, निंबूत, वाणेवाडी, होळ, वडगाव निंबाळकर परिसरातील रस्त्यांची वाळूमुळे दुरवस्था झाली आहे. नीरा नदीपात्रातील वाळू उपसा करून बारामती, पुणे परिसरात विक्री करण्यात येते. पुणे शहरात वाळूला दुपटीने वाळूविक्री करण्यात येते. नदीपात्रातून ट्रॅक्टर, ट्रकद्वारे वाळूउपसा होतो. त्यानंतर १० चाकी ट्रकमध्ये ही वाळू भरून विक्रीसाठी पाठविण्यात येत असल्याचे चित्र आहे.
महसूल, पोलीस यंत्रणेकडून वाळूउपशावर कारवाई केली जाते. मात्र, वाळू सम्राटांना कायमस्वरूपी चाप बसत नाही. बारामती उपविभागातील बारामती, इंदापूर या तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात वाळूउपसा कऱ्हा, नीरा, भीमा या नद्यांच्या पात्रातून होतो. त्यामुळे नदीचे पात्र बदलले आहे. पर्यावरणाची हानी होत आहे. (प्रतिनिधी)
पुन्हा त्याच ठिकाणी वाळूउपसा...
भीमा आणि नूरा या नद्यांनी पुणे, नगर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांच्या सीमारेषा आखल्या आहेत़ त्यामुळे अनेकदा पुणे जिल्ह्यातील पथकाने कारवाईला सुरुवात केली की, वाळू माफिया नदीच्या पलिकडे दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन आपला वाळूउपसा सुरु ठेवतात़ त्यामुळे आता संयुक्त कारवाया सुरु करण्यात आल्या आहेत़ तरीही या कारवायांना वाळूमाफिया जुमानत नाही़ आज कारवाई केली गेली की, दोन दिवसांनी पुन्हा त्याच ठिकाणी वाळू उपसा सुरु असल्याचे दिसून येते़