तंत्रज्ञान आणि भाषांचा आविष्कार परस्परपूरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:17 AM2021-09-10T04:17:31+5:302021-09-10T04:17:31+5:30

डॉ. विजय भटकर : डॉ. हेडगेवार प्रज्ञा सन्मान प्रदान पुणे : भाषा हे कोणताही आविष्कार समजून घेण्याचे महत्त्वाचे ...

The invention of technology and languages is complementary | तंत्रज्ञान आणि भाषांचा आविष्कार परस्परपूरक

तंत्रज्ञान आणि भाषांचा आविष्कार परस्परपूरक

Next

डॉ. विजय भटकर : डॉ. हेडगेवार प्रज्ञा सन्मान प्रदान

पुणे : भाषा हे कोणताही आविष्कार समजून घेण्याचे महत्त्वाचे साधन असते. भाषेच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञानाची जोडही महत्त्वाची आहे. संस्कृत आधारित तंत्रज्ञानाचा संपूर्ण जगाला उपयोग होऊ शकतो. म्हणूनच विज्ञान, तंत्रज्ञान आणि भाषांचा आविष्कार एकमेकांना पूरक असायला हवा, असे मत ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले. नवीन शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने स्वातंत्र्यानंतर प्रथमच प्राथमिक आणि उच्च शिक्षण भारतीय भाषांमध्ये देण्याचा स्तुत्य विचार पुढे आला आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.

कोलकात्यातील श्री बडाबाजार कुमारसभा पुस्तकालयातर्फे दिला जाणारा डॉ. हेडगेवार प्रज्ञा सन्मान पुरस्कार डॉ. भटकर यांना भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या सभागृहात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये व सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी डॉ. भटकर बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समरसता गुरुकुलमचे संस्थापक अध्यक्ष गिरीश प्रभुणे, बडाबाजार कुमारसभा पुस्तकालयाचे सचिव महावीर बजाज प्रत्यक्ष, संघाचे सहसरकार्यवाह रामदत्त चक्रधर, कुमारसभा बडाबाजार पुस्तकालयाचे अध्यक्ष डॉ. प्रेमशंकर त्रिपाठी व संस्थेचे पदाधिकारी आभासी पद्धतीने उपस्थित होते.

भटकर म्हणाले, ''परम संगणकाच्या निर्मितीवेळी आम्ही विविध भाषांचा अभ्यास केला. त्या वेळी माझ्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे कोणत्याही भाषेच्या विकासासाठी, ती भाषा तगून राहण्यासाठी तिला तंत्रज्ञानाचे पाठबळ देणे आवश्यक आहे. देशात आज अशाही अनेक भाषा आहेत, की त्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, तर अनेक भाषा लुप्तही झाल्या आहेत. त्यामुळेच कोणतीही भाषा टिकणे, ती बहरणे व तिच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञानाचे शिक्षण भारतीय भाषांतून दिले गेले, तर ते आपल्या सर्व भाषांना उपकारकच ठरेल आणि हे ज्ञान सर्वसामान्य विद्यार्थ्यापर्यंत सहजतेने पोहोचेल. विज्ञानाचे ज्ञान आधुनिक दृष्टी देऊ शकेल.''

चक्रधर म्हणाले, ''स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना आपल्यातील स्वत्वाची जाणीव होणे गरजेचे आहे. बौद्धिक गुलामगिरीतून बाहेर पडणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रात आपल्याला अद्याप पुरेसे स्वातंत्र्य मिळालेले नाही. शिक्षण क्षेत्रासह भाषेतही स्वजागृती व राष्ट्रभक्तीभाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे.''

परम संगणकाची यशस्वी निर्मिती करून डॉ. भटकर यांनी देशाला आधुनिक युगात आणून ठेवले, असे प्रभुणे यांनी सांगितले. वंजारवाडकर यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. त्रिपाठी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वैद्य आशुतोष जातेगावकर यांनी गीतगायन केले. महावीर बजाज यांनी मानपत्राचे वाचन केले. तसेच, आभार मानले. डॉ. तारा दुगड यांनी सूत्रसंचालन केले.

.................................................................... फोटो : ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांना डॉ. हेडगेवार प्रज्ञा सम्मान पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी (डावीकडून) लक्ष्मीनारायण भाला, डॉ. तारा दुगड, डॉ. भटकर, वंजारवाडकर, गिरीश प्रभुणे व महावीर बजाज.

Web Title: The invention of technology and languages is complementary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.