टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाचा आविष्कार; १६ वर्षांनी महिलेने दिला लक्ष्मी, सरस्वती अन् पार्वतीला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 04:25 PM2021-07-31T16:25:39+5:302021-07-31T16:44:30+5:30
बारामतीतील दाम्पत्याला लग्नानंतर १६ वर्षे त्यांना मुल झाले नाही. अपत्य प्राप्तीसाठी वैद्यकीय उपचार त्यांच्यावर सुरू होते...
बारामती : आई होणं हे कोणत्याही महिलेच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा क्षण असतो. बारामती येथील एका दांपत्याला १६ वर्षांनंतर अपत्यप्राप्तीचा आनंद मिळाला आहे. शुक्रवारी (दि. ३०) वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने लक्ष्मीच्या पावलांनी या दांपत्याच्या घरात तिळ्या अवतरल्या आहेत. या महिलेची आणि तिन्ही बाळांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉ. राजेश कोकोरे यांनी सांगितले.
डॉ. राजेश कोकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीतील एक दाम्पत्याला लग्नानंतर १६ वर्षे त्यांना मुल झाले नाही. अपत्य प्राप्तीसाठी वैद्यकीय उपचार त्यांच्यावर सुरू होते. अशातच टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे ठरले. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महिलेला गर्भधारणा झाल्यानंतर सोनोग्राफीच्या तपासणीमध्ये महिलेल्या गर्भाशयाच तीन गर्भ रूजल्याचे लक्षात आले.
महिलेचे वय पाहता डॉ. कोकोरे यांनी त्यांना गर्भपाताचा सल्ला दिला होता. मात्र इतक्या वर्षांनंतर आपल्या गर्भात आपले एक नाही तर तीन-तीन बाळं वाढत असल्याने या महिलेला व पतीलाही आपल्या होणाºया बाळांविषयी प्रचंड ओढ निर्माण झाली होती. डॉक्टर तुम्ही सांगता तशी काळजी घेऊ पण आम्हाला आमची तीनही बाळं हवी आहेत. असा निश्चय या दांपत्याने डॉ. कोकरे यांच्याकडे व्यक्त केला.
डॉ. कोकरे सांगतात, त्यांचा निश्चय पाहून मी आणि आमच्या स्टाफनेही ‘अपेक्षांनी भरलेलं हे आईपणाचं सुंदर ओझं अतीव व काळजीनं सांभाळायचं’ असं ठरवलं. या भगिनीची अत्यंत मायेने एका माहेरवाशिनीची काळजी घ्यावी तशी काळजी,देखभाल आम्ही आणि आमचा घेत होतो. सातव्या महिन्यामध्ये एक दोनदा या महिलेला प्रसुती कळा सुद्धा आल्या. आता काय होतंय. भीतीने जरा दडपण आले होते. परंतू, यावेळी गर्भाशयाला टाका मारुन परत आहे. गर्भातल्या तीन पणत्या कायम तेवत ठेवल्या. योग्य उपचारांमुळे तीनही बाळांची वाढ दिसामाजी चांगली होत होती.
या दाम्पत्याला घरातल्या मंडळी, मी स्वत: माझा स्टाफ यांच्या चेहऱ्यावर काळजी आणि उत्सुकता नेहमी होती. नववा महिना सुरू झाल्यानंतर हा काळ जास्त काळजीचा होता. कोणताही धोका नको म्हणून डॉ. कोकरे यांनी आठवडाभर आधीच या महिलेला रूग्णालयात अॅडमिट करून घेतले. रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण याची वेळोवेळी तपासणी केली जात होती. या आधी देखील डॉ. राजेश कोकरे यांनी अनेक प्रसुती केल्या आहेत. त्यांच्या रूग्णालयात जुळी मुले, अवघल्या बाळंतिणीच्या प्रसुती देखील सहजतेने पार पडल्या आहेत. मात्र, यावेळी तिळी मुलं असल्याने त्यांच्यासमोर देखील आव्हान होते.
----------------------------
महिलेचे वय पाहता नैसर्गिक प्रसुती करणे धोक्याचे होते. म्हणून आम्ही सिझरचा पर्याय निवडला. त्यासाठी तयारी देखील केली. रक्ताच्या बाटल्या तयार ठेवल्या. महिलेच्या सर्व तपासण्या योग्या आल्याचे पाहून मी व माझा स्टाफ, भूलतज्ज्ञ डॉ. आनंद वणवे आम्ही सर्वांनी सिझरला सुरूवात केली. अनेक वर्षांच्या सरावामुळे पहिल्या बाळाला आम्ही सुरक्षित बाहेर काढले. यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या बाळाचा जन्म झाला. तीनही मुली होत्या. जणू लक्ष्मी, पार्वती, सरस्वती जन्माला आल्यासारखे वाटले. सध्या महिला व तीनही मुलींची प्रकृती उत्तम आहे. दोन मुलींचे वजन १.९ किलो, तर एका मुलीचे वजन १.७ किलो आहे. बालरोगतज्ज्ञ डॉ. वरद देवकाते या बाळांची सध्या काळजी घेत आहेत.
- डॉ. राजेश कोकरे, महिला आरोग्य तज्ज्ञ, बारामती