भोरमधील स्टोन क्रशर व खाणीची चौकशी करून अहवाल सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:09 AM2021-05-22T04:09:31+5:302021-05-22T04:09:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भोर तालुक्यातील पारवाडी येथे सुरू असलेल्या स्टोन क्रशर व खाणीच्या कामामुळे पर्यावरण व पिकांचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भोर तालुक्यातील पारवाडी येथे सुरू असलेल्या स्टोन क्रशर व खाणीच्या कामामुळे पर्यावरण व पिकांचे नुकसान होत आहे. तसेच पाण्याची पातळी कमी होत असून हाद-यांमुळे घरांना तडे जात आहे, अशी तक्रार करण्यात आली आहे. त्यावर या स्टोन क्रशर व खाणीच्या कामाची चौकशी करावी. तेथे पर्यावरणाचे नुकसान होत आहे, असे निदर्शनास आल्यास संबंधित यंत्रणेने कारवाई करावी व याबाबतचा अहवाल तीन महिन्यांत सादर करावा, असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दिले आहेत.
राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण (एसईआयए), राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (एसपीसीबी) आणि जिल्हा न्यायदंडाधिकारी यांना हे आदेश देण्यात आले आहेत. पारवाडी ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या स्टोन क्रशर व खाणकामाबाबत गावचे सरंपच पुष्पा लिमण, उपसरपंच शरद भगत व सदस्यांनी ओम साई क्रशर आणि इतरांविरोधात ॲड. राजेश कातोरे आणि ॲड. तेजस कांबळे यांच्यामार्फत एनजीटीत दावा दाखल केला होता. गावांमध्ये सुरू असलेले स्टोन क्रशर मशिन हे बेकायदेशीर असून त्यामुळे पर्यावरण व पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे स्टोन क्रशर व खाण बंद करून त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करावी, असे दाव्यात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे याबाबत एसईआयए, एसपीसीबीजिल्हा आणि जिल्हा न्यायदंडाधिकारी यांची कमिटी स्थापन केली आहे.
स्टोन क्रशर व खाणीमुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे का? तसेच असेल तर कारवाई करून त्याबाबत काही दंड आकारला जाऊ शकतो का? याबाबत पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. आदेश दिल्यापासून तीन महिन्यांत याचा अहवाल एनजीटीत सादर करावा. तसेच तक्रारदार यांनी याबाबतची कागदपत्रे दोन आठवड्यांत समितीकडे सादर करावी, असे निकालात नमूद आहे.