जुन्नरमधील गणेश मंदिर चोरी प्रकरणाचा तपास, टोळीच्या म्होरक्यास पोलिसांनी केले जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 07:32 PM2023-08-16T19:32:07+5:302023-08-16T19:35:01+5:30
बत्तीस गुन्हे दाखल असलेली तसेच मंदिरात चोरीचे गुन्हे करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या म्होरक्याकडून जुन्नर येथील सिद्धिविनायक गणेश मंदिरातील चोरीतील सुमारे साडेचार लाख रुपयांची चांदीची मूर्ती व दागिने हस्तगत करण्यात आले आहेत...
जुन्नर (पुणे) :जुन्नर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये झालेल्या गणपती मूर्ती व दागिन्यांच्या चोरीप्रकरणी आंतरजिल्हा टोळीच्या म्होरक्यास साथीदारासह स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि जुन्नर पोलिसांनी जेरबंद केले आहे. बत्तीस गुन्हे दाखल असलेली तसेच मंदिरात चोरीचे गुन्हे करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या म्होरक्याकडून जुन्नर येथील सिद्धिविनायक गणेश मंदिरातील चोरीतील सुमारे साडेचार लाख रुपयांची चांदीची मूर्ती व दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी मार्गदर्शन करून एक पथक नेमले होते. या पथकाने मंदिर चोरीतील गुन्ह्याचे घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून आरोपींची ओळख पटविल्यानंतर गुन्ह्यातील चोरटे हे सराईत असून वेगवेगळ्या जिल्ह्यांचे रेकॉर्डवरील आहेत, अशी माहिती काढली होती. आरोपींचा शोध घेत असताना म्होरक्या भास्कर खेमा पथवे (वय ४६ वर्षे, रा. नांदूर दुमाला, जि. नगर) यास घोडेगाव परिसरातून पोलिसांनी अटक केली.
त्याच्याकडील चौकशीत त्याने जुन्नर, मंचर, कान्हूर मेसाई, लेण्याद्री येथील मंदिरात त्याचा साथीदार सोमनाथ शिवाजी भुतांबरे (वय २४ वर्षे, रा. समशेरपूर, ता. अकोले, जि. नगर) याचे मदतीने केले असून चोरीचे चांदीचे दागिने राजेंद्र रघुनाथ कपिले, वय ६२ वर्षे, रा. संगमनेर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर यास विक्री केले असल्याचे उघड झाले.
आरोपीकडून सिद्धिविनायक गणेश मंदिर चोरीतील पाच किलो ग्रॅम वजनाची चांदीची गणपतीच्या मूर्तीसह एकूण सहा किलो सातशे ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने रुपये ४,६७,०००/- किमतीचे हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच आरोपी सोमनाथ भुतांबरे यास लेण्याद्री फाटा जुन्नर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. याच आरोपीकडून पुणे ग्रामीण जिल्ह्यातील एकूण चार गुन्हे उघडकीस आले असून अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील मंदिर घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याचे आरोपींनी सांगितले आहे.
जुन्नर शहरातील ग्रामदैवत असलेले गणेश मंदिर, अष्टविनायकापैकी एक असलेले लेण्याद्री मंदिरातील गिरीजात्मज गणपती, कान्हूर मेसाई येथील कुलदेवी मेसाई देवीचे मंदिर मंचर जाधववाडी परिसरातील तुकाई माता मंदिरात या चोरट्यांनी चोऱ्या केल्या होत्या.