‘आयआयई’ वादाच्या भोव-यात, अनियमिततेबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:28 AM2017-09-20T00:28:07+5:302017-09-20T00:28:10+5:30
जे. पी. नाईक यांनी स्थापन केलेली भारतीय शैक्षणिक संस्था (आयआयई) वादाच्या भोव-यात सापडली आहे. संस्थेतील अनियमिततेबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
पुणे : जे. पी. नाईक यांनी स्थापन केलेली भारतीय शैक्षणिक संस्था (आयआयई) वादाच्या भोव-यात सापडली आहे. संस्थेतील अनियमिततेबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच संस्थेच्या अध्यक्षा अरुणा गिरी आणि डॉ. सदानंद मोरे यांच्यासह चार विश्वस्त मंडळातील सदस्यांनीही काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला आहे. संस्थेतील कामकाजाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. दरम्यान, मंगळवारी संस्थेचे नवे अध्यक्ष म्हणून डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे निवड करण्यात आली.
जे.पी. नाईक व चित्रा नाईक यांनी शिक्षणक्षेत्राला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने ‘आयआयई’च्या माध्यमातून मोठी चळवळ उभी केली. मात्र, सध्या या संस्थेत अंतर्गत वाद सुरू झाले आहेत. डॉ. मुणगेकर यांनी मंगळवारी याविषयी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
ते म्हणाले, की गिरी यांनी दीड महिन्यापूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर १५ दिवसांतच उपाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, विश्वस्त मंडळाचे सदस्य डॉ. सुहास पळशीकर, धनवंती हर्डीकर व विनया मालती हरी यांनी राजीनामा दिला आहे. संस्थेच्या कामकाजाविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संस्थेच्या घटनेनुसार विश्वस्त मंडळामध्ये किमान सात सदस्य कार्यरत असणे अपेक्षित आहे. पाच जणांनी राजीनामा दिल्याने केवळ पाचच सदस्य उरले होते. त्यामुळे मंगळवारी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत संस्थेच्या आजीव सदस्यांमधील तीन व सन्माननीय सदस्यांमधील दोघांची मंडळावर निवड करण्यात आली. सुचेता कोरगावकर, जयंत कळके, शरद जावडेकर, दिलीप नाचणे व
प्रा. आर. एस. देशपांडे अशी त्यांची नावे आहेत.
या बैठकीत डॉ. मुणगेकर यांची अध्यक्ष म्हणून, तर प्रा. देशपांडे यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. तसेच संस्थेतील संचालक प्रा. मर्झबान जाल यांची वर्तणूक योग्य नसल्याचा ठपका मंडळाने ठेवला आहे. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून, त्यांना यापुढे संस्थेच्या आवारातही प्रवेश दिला जाणार नाही. त्यांच्या चौकशीसाठी समितीही नेमण्यात आली आहे.
जाल यांच्या जागी प्रा. बी. एन. कांबळे यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे, असे मुणगेकर यांनी सांगितले. दरम्यान, जाल यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून
लावून हा निर्णय अमान्य असल्याचे सांगितले. तसेच, विश्वस्त
मंडळच बेकायदेशीर असून अनेक अनियमित गोष्टी संस्थेत सुरू असल्याचे स्पष्ट केले.
>स्मृतिचिन्हे, पुरस्कार परत करा
काही दिवसांपूर्वी अरुणा गिरी व त्यांच्या मुलाने संस्थेत येऊन तेथील नाईक यांची काही स्मृतिचिन्हे, पुरस्कार जबरदस्तीने घरी नेले आहेत. ही कृती अत्यंत चुकीची असून त्यांच्याविरोधात पोलिसांतही तक्रार करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार गिरी यांना घरी नेलेले पुरस्कार कोणत्याही अटीशिवाय परत करण्याचे पत्राद्वारे कळविले जाणार आहे, अशी माहिती मुणगेकर यांनी दिली.
कोणत्याही वैयक्तिक व्यक्तीच्या विरोधात तक्रार नाही. संस्थेच्या एकूणच कामकाजाच्या पद्धतीला कंटाळून राजीनामा दिला आहे. अशा स्थितीत काम करणे अशक्य होते. - डॉ. सदानंद मोरे
संस्थेतील काही जुन्या मुद्द्यांवर वाद आहेत. विश्वस्त मंडळाच्या बैठकीतही त्यावरून मतभेद होते. या गोंधळाच्या स्थितीत
काम करणे तसेच संस्थेमध्ये पूर्णवेळ देणेही शक्य नसल्याने राजीनामा दिला आहे. - विनया मालती हरी
>आयसीएसएसआर
संस्थेची चौकशी सुरू
इंडियन कौन्सिल आॅफ सोशल सायन्स रीसर्च (आयसीएसएसआर) या संस्थेकडून आयआयईमध्ये अनियमितता असल्याबाबत तक्रार करण्यात आली आहे. त्यानुसार सह धर्मादाय आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. संस्थेचे कामकाज, सदस्यांची निवड, बैठका यांसह विविध मुद्द्यांवर चौकशी सुरू आहे.
- कैलास महाले, निरीक्षक, सह धर्मादाय आयुक्त कार्यालय