टेकडी, घाट परिसरातील गुन्ह्यांची चौकशी; ४० गावे पालथी घातली, ४५० गुन्हेगार तपासले, पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 12:42 PM2024-10-10T12:42:02+5:302024-10-10T12:42:16+5:30

बोपदेव घाट घटनास्थळापासून जवळ असलेल्या सुमारे ४० छोट्या - मोठ्या गावांमध्ये जाऊन पोलिसांनी पाहणी केली

investigation of crimes in tekdi and ghat area 40 villages raided 450 criminals checked, Pune police on mode | टेकडी, घाट परिसरातील गुन्ह्यांची चौकशी; ४० गावे पालथी घातली, ४५० गुन्हेगार तपासले, पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

टेकडी, घाट परिसरातील गुन्ह्यांची चौकशी; ४० गावे पालथी घातली, ४५० गुन्हेगार तपासले, पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

पुणे: बोपदेव घाटासह शहरातील प्रमुख घाट, टेकडी परिसरात यापूर्वी लुटमार, दरोडा, विनयभंग तसेच बलात्कारासारखे गंभीर गुन्हे केलेल्या सराईत गुन्हेगारांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंत घटनास्थळाजवळील ४० गावे पोलिसांनी पालथी घातली असून, सुमारे ४५० रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे.

बोपदेव घाट परिसरात गुरुवारी (दि. ३) रात्री मित्राबरोबर फिरायला आलेल्या तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पसार झालेल्या आरोपींचा अद्याप शोध लागला नसून पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यासाठी पोलिसांनी ६० तपास पथके तयार केली आहेत. तसेच गेल्या पंधरा दिवसांमध्ये बोपदेव घाटमार्गे गेलेल्या सुमारे ५० हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती संकलित करण्यात आली असून, या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे. याशिवाय यापूर्वी शहरातील प्रमुख टेकड्या, घाट परिसरात विनयभंग, बलात्कार, दरोडा असे गंभीर गुन्हे केलेल्या आरोपींची चौकशी करण्यात आली आहे. घटनास्थळापासून जवळ असलेल्या सुमारे ४० छोट्या - मोठ्या गावांमध्ये जाऊन पोलिसांनी पाहणी केली. त्या गावांतील ढाबे, दारू विक्रेते, लपूनछपून अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडे चौकशी करून माहिती घेण्यात आली आहे. पोलिसांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक हॉटेलवरील सीसीटीव्ही तपासले. मात्र, त्यामध्ये पूर्ण रस्त्यावरील परिसर दिसत नसल्याने अडचणी येत आहेत. सासवड, राजगड पोलिसांची देखील मदत घेण्यात येत असून पोलिसांकडून आरोपींचा माग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

...कारागृहातील सराईतांकडे चौकशी

अनेकदा गुन्हेगारांकडून गुन्हेगारांची माहिती मिळते. त्याअनुषंगाने पोलिसांनी येरवडा कारागृहातील सराईत गुन्हेगारांची चौकशी करून माहिती घेतली. त्यांना संशयित आरोपींचे स्केच दाखवण्यात आले. त्यावरून आरोपींबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Web Title: investigation of crimes in tekdi and ghat area 40 villages raided 450 criminals checked, Pune police on mode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.