पीएमपीच्या भ्रष्ट अधिका-यांमागे लागणार चौकशीचा ससेमिरा
By admin | Published: November 22, 2014 12:27 AM2014-11-22T00:27:55+5:302014-11-22T00:27:55+5:30
गेल्या सात वर्षांत पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) सक्षम होण्याऐवजी काही अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे ती खिळखिळी झाली आहे.
पुणे : गेल्या सात वर्षांत पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) सक्षम होण्याऐवजी काही अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे ती खिळखिळी झाली आहे. त्यामुळे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याचे मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. त्यावर नगरसेवकांची मागणी लक्षात घेऊन संबंधितांची चौकशी करून पुढील कार्यवाही करण्याची सूचना पीएमपी सरव्यवस्थापकांना देण्यात येतील, असे आश्वासन आयुक्त कुणाल कुमार यांनी आज सर्वसाधारण सभेत दिले.
पीएमपी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगातील फरक व आर्थिक तूट भरून काढण्यासाठी महापालिकेने ५० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव मुख्यसभेत आला. त्या वेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी पीएमपीच्या गैरकारभारावर ताशेरे ओढले. गेल्या सात वर्षांत महापालिकेने पीएमपीला ४०७ कोटी रुपये देऊन, कारभार सुधारला नाही. त्याला पीएमपीचे काही अधिकारी जबाबदार असून, नवीन आयएएस दर्जाचा अधिकारी नियुक्त केला पाहिजे, अशी मागणी उपमहापौर आबा बागुल यांनी केली. पीएमपी संचालक मंडळ व मुख्यसभेचेही मुजोर अधिकारी ऐकत नाहीत, असा आक्षेप नगरसेवक अप्पा रेणुसे यांनी घेतला.
पीएमपीचे मार्ग अधिक अन् कर्मचारी कमी, तर पिंपरी चिंचवड हद्दीतील मार्ग कमी अन् कर्मचारी दुप्पट आहेत. हासुद्धा एक घोटाळा असून, सीआयडीतर्फे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केली. बुरसे व माने हे दोन्ही अधिकाऱ्यांची शैक्षणिक पात्रता नसताना पीएमपीमध्ये अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. हा प्रकार थांबविण्यास पीएमपी संचालक मंडळ असमर्थ आहे. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत, असा आरोप नगरसेवक अविनाश बागवे यांनी केला. त्यावर नगरसेवक प्रशांत जगताप यांनी आपेक्ष घेतला. पीएमपी कामगारांसाठी, की ठेकेदारांसाठी असा सवाल नगरसेवक विजय देशमुख यांनी उपस्थित केला. पीएमपीऐवजी ठेकेदारांतर्फे बस चालविल्या जात असल्याने अधिकाऱ्यांंना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी शिवसेना गटनेते अशोक हरणावळ यांनी केली.
(प्रतिनिधी)