संघटित गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांची आता चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:13 AM2021-03-23T04:13:18+5:302021-03-23T04:13:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सर्व बड्या गँगस्टरांवर कारवाई ...

Investigations are now underway into those who helped organized crime | संघटित गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांची आता चौकशी सुरू

संघटित गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांची आता चौकशी सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सर्व बड्या गँगस्टरांवर कारवाई सुरू केली आहे. मोक्का, तडीपारी, स्थानबद्धता अशा विविध मार्गाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. आता या गँगस्टरना मदत करणाऱ्या व त्यांच्यासाठी मध्यस्थ करणाऱ्याची चौकशी सुरू केली आहे. शहरातील एका बड्या राजकीय नेत्याला आज पोलीस आयुक्तालयात बोलविण्यात आले होते. त्यामुळे शहरात त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली.

गजानन मारणे याने तळोजा तुरुंगातून सुटल्यावर जंगी मिरवणूक काढून पोलिसांना आव्हान दिले होते. त्यामुळे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मारणे याच्यासह सर्वच गँगस्टरांविरुद्ध मोहीम उघडली आहे. गेल्या ५ महिन्यांत त्यांनी दीडशेहून अधिक जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. १५ हून अधिक गुन्हेगारांना स्थानबद्ध केले आहे. आता त्यांनी या गँगस्टरांना मदत करणार्‍यांकडे आपले लक्ष वळविले आहे. त्यातूनच गजानन मारणे याला मदत करणाऱ्या पुण्यातील एक राजकीय नेते आणि व्यावसायिक यांना पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी बोलावले होते.

पोलीस आयुक्तालयात आज दुपारी अनेक आलिशान गाड्या आल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे वेधले गेले. या नेत्याला बर्‍याच वेळ बसवून ठेवले. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली. या चौकशीतून पोलिसांनी त्यांना योग्य तो इशारा दिल्याचे सांगण्यात येत आहे. शहरातील संघटित गुन्हेगार टोळ्यांना आश्रय देणारे तसेच त्यांना मदत करणार्‍यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. त्यातूनच काही जणांकडे चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

Web Title: Investigations are now underway into those who helped organized crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.