संघटित गुन्हेगारांना मदत करणार्यांचे धाबे दणाणले ; शहरातील बड्या राजकीय नेत्याची तासभर चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 09:52 PM2021-03-22T21:52:36+5:302021-03-22T21:53:43+5:30
शहरातील संघटित गुन्हेगार टोळ्यांना आश्रय देणारे तसेच त्यांना मदत करणार्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.
पुणे : शहरातील संघटित गुन्हेगारी मोडित काढण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सर्व बड्या गँगस्टारांवर कारवाई सुरु केली आहे. मोक्का, तडीपारी, स्थानबद्धता अशा विविध मार्गाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. आता या गँगस्टरांना मदत करणार्या व त्यांच्यासाठी मध्यस्थ करणार्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. शहरातील एका बड्या राजकीय नेत्याला आज पोलीस आयुक्तालयात बोलविण्यात आले होते. त्यामुळे शहरात त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली.
गजानन मारणे याने तळोजा तुरुंगातून सुटल्यावर जंगी मिरवणुक काढून पोलिसांना आव्हान दिले होते. त्यामुळे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मारणे याच्यासह सर्वच गँगस्टारांविरुद्ध मोहिम उघडली आहे. गेल्या ५ महिन्यात त्यांनी दीडशेहून अधिक जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. १५ हून अधिक गुन्हेगारांना स्थानबद्ध केले आहे. आता त्यांनी या गँगस्टरांना मदत करणार्यांकडे आपले लक्ष वळविले आहे. त्यातूनच गजानन मारणे याला मदत करणार्या पुण्यातील एक राजकीय नेते आणि व्यावसायिक यांना पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
पोलीस आयुक्तालयात आज दुपारी अनेक आलिशान गाड्या आल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे वेधले गेले. या नेत्याला बर्याच वेळ बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. या चौकशीतून पोलिसांनी त्यांना योग्य तो इशारा दिल्याचे सांगण्यात येत आहे.
शहरातील संघटित गुन्हेगार टोळ्यांना आश्रय देणारे तसेच त्यांना मदत करणार्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. त्यातूनच काही जणांकडे चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.